सांगली : महापालिका क्षेत्र शंभर टक्के हागणदारीमुक्त करू : रवींद्र खेबूडकर, आणखी शौचालये बांधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:00 PM2018-05-09T13:00:46+5:302018-05-09T13:00:46+5:30
अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
सांगली : केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त घोषित झाले आहे. जानेवारीमध्ये क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या पथकाने पुन्हा महापालिका क्षेत्राची पाहणी करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
ते म्हणाले, हागणदारीमुक्त शहर अभियानासाठी महापालिकेने सर्व्हे करून ७९९५ घरांमध्ये व्यक्तिगत स्वच्छतागृहे नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शासनाने महापालिकेला ३५०० स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. महापालिकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ३७०० वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदानही नागरिकांना देण्यात आले.
अजून ८०० घरांमध्ये वैयक्तिक शौचालये नाहीत. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ही शौचालये पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्र शंभर टक्के हागणदारीमुक्त होईल व अभियानात ओडीएफ प्लसमध्ये सांगलीचा समावेश होईल. त्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे खेबूडकर म्हणाले.
वैयक्तिक शौचालयांबाबत सध्या काही नागरिकांच्या अडचणी आहेत. झोपडपट्टी परिसरात जागेची अडचण आहे. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत स्वच्छतागृहांचा लाभ देणे अडचणीचे ठरत आहे. त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे वाढविण्याचे काम हाती घेणार असल्याचेही खेबूडकर म्हणाले.