ऐतिहासिक मोर्चासाठी सांगली ‘मराठा’मय
By admin | Published: September 25, 2016 11:50 PM2016-09-25T23:50:32+5:302016-09-25T23:50:32+5:30
तयारी अंतिम टप्प्यात : पायाला भिंगरी लावून कार्यकर्ते राबताहेत; मराठा क्रांती मोर्चाचा गजर
सांगली : मंगळवार, दि. २७ सप्टेंबरला सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चाला अवघे दोन दिवस उरल्याने, जिल्ह्यात सर्वत्र नियोजनाच्या बैठकांनी वेग घेतला आहे. या विराट मोर्चासाठी सर्व भागातून राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी महिला प्रतिनिधी, स्वयंसेवकांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. सांगलीतील मोर्चाच्या नियोजनावर प्रशासनही लक्ष ठेवून असून, प्रशासकीय पातळीवरही स्वच्छता, पाण्याची सोय, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकांनी गेला पंधरवडा अक्षरश: ढवळून निघाला आहे. जिल्हा संपर्क कार्यालयाबरोबरच तालुका आणि गावपातळीवरही बैठका, वाहनांची सोय, त्यांच्या अल्पोपहाराची सोय आदींचे नियोजन करण्यात येत आहे.
मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून होणार असून, राम मंदिर चौकात समारोप होणार आहे. सध्या या मार्गावरील स्वच्छता, दिवाबत्तीची सोय, या मार्गावरील वाहने, रूग्णवाहिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे.
रविवारी दिवसभर राम मंदिर चौक ते कॉँग्रेस भवन चौक, राम मंदिर चौक ते पुष्पराज चौक या रस्त्यावरील ध्वनिक्षेपक यंत्रणेचे काम पूर्ण करून सायंकाळी याची चाचणी घेण्यात आली. पुष्पराज चौक ते मार्केट यार्ड व विश्रामबागपर्यंत ही सोय करण्यात येणार आहे.
विक्रमी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानेही जोरदार तयारी केली आहे. रविवारी दिवसभर पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी करून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सायंकाळी महापौर हारूण शिकलगार यांनीही संपर्क कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. (प्रतिनिधी)
मोर्चाची सुरूवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून सकाळी ११ वाजता होणार आहे. मोर्चात अग्रभागी मुली असणार असून, त्यानंतर महाविद्यालयीन तरूणी, महिला असा क्रम आहे. निवडलेल्या पाच मुली शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार असून, नंतर त्या मोर्चात सहभागी होणार आहेत. तीन ठिकाणी हेलिकॅमची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे.