सांगली बाजार समितीत बदलाचे वारे
By admin | Published: October 10, 2016 12:40 AM2016-10-10T00:40:16+5:302016-10-10T00:40:16+5:30
घडामोडींना वेग : इच्छुकांची छुपी मोर्चेबांधणी; २० तारखेपर्यंत विद्यमान पदाधिकारी राजीनामा देणार ?
शरद जाधव ल्ल सांगली
कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकारी बदलाच्या चर्चेने वेग घेतला आहे. सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने येत्या २० तारखेपर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधारी गटात दिग्गज नेत्यांचा सहभाग असल्याने त्यांच्या समर्थकांनी सभापती, उपसभापतीपद मिळविण्यासाठी नाव पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे.
सभापती पदासाठी सध्या तरी विशाल पाटील गटाचे अनुभवी सदस्य अण्णासाहेब कोरे, पतंगराव कदम गटाचे प्रशांत शेजाळ आणि अजितराव घोरपडे गटाचे दीपक शिंदे यांची नावे आघाडीवर असली तरी, नेतेमंडळी ऐनवेळी कोणता निर्णय घेतात, यावर बाजार समितीतील पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अवलंबून आहे.
तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मोठ्या संघर्षाने पार पडली होती. त्यानंतर सर्व शक्यतांना धक्के देत माजी मंत्री पतंगराव कदम, अजितराव घोरपडे, खा. राजू शेट्टी, विशाल पाटील आदींचे नेतृत्व असलेल्या पॅनेलने बाजी मारली होती. सभापती पदासाठी पहिल्या टर्मसाठी जत तालुक्याला संधी देण्यात आली होती. सत्ताधारी गटाच्या अलिखित अजेंड्यानुसार वर्षाला पदाधिकारी बदल करावयाचा असल्याने, विद्यमान सभापती संतोष पाटील व उपसभापती जीवन पाटील यांना राजीनामा देण्याचे आदेश गटाचे नेते पतंगराव कदम यांनी दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी निवडीत आपल्याला संधी मिळावी, यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
संचालक मंडळातील अनुभवी अण्णासाहेब कोरे यांनी दावेदारी बळकट करीत, यावेळी सभापतीपद मिळावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. गेल्यावर्षी सभापती निवडीवेळीच सत्ताधारी गटाचे नेते कदम यांनी, पुढीलवेळी संधी दिली जाईल, असा शब्द दिल्याचे कोरे यांनी सांगितले. याशिवाय समाजकारणाचा आणि एकनिष्ठपणे कॉँग्रेसमध्ये ३० वर्षाहून अधिक अनुभव असल्याने संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्याने, विशाल पाटील गटाला सभापतीपद दिल्यास कोरे यांचे नाव निश्चित असेल.
सभापती पदाच्या अन्य दावेदारांपैकी घोरपडे गटाचे निष्ठावान सदस्य असलेले दीपक शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मिरज पूर्व भागातील घोरपडे गटाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यात शिंदे यशस्वी ठरल्याने नेत्यांच्या चर्चेत सभापतीपद घोरपडे गटाच्या पदरात पडल्यास शिंदे यांचा विचार होणार आहे. अनुभवी सदस्य म्हणून तानाजी पाटील यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.
सभापती पदाच्या अन्य दावेदारांपैकी कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रशांत शेजाळही सभापती पदासाठी दावेदार आहेत. मात्र, सध्या सभापतीपद कदम गटाकडे असल्याने शेजाळ यांनी राजीनामा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांच्याबरोबरच इतरही सदस्य इच्छुक आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सत्ताधारी गटाला अनुकूल वातावरण करण्यासाठी सभापती निवडी करताना नेत्यांचा कस लागणार आहे. मध्यंतरी ढिली झालेली सत्ताधारी गटाची मोट एकत्र बांधण्यासाठीही नेत्यांची कसोटी लागणार आहे.
निवडी : दिवाळीपूर्वी
बाजार समितीतील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले असले तरी, २० तारखेपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर आठवडाभरातच दिवाळी असल्याने, सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांनी, दिवाळीपूर्वीच निवडी होण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.