सांगली बाजार समिती : दिनकर पाटील सभापती - उपसभापतिपदी तानाजी पाटील, निवडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:58 AM2018-01-12T00:58:03+5:302018-01-12T01:02:09+5:30
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे दिनकर महादेव पाटील (सोनी) यांची, तर उपसभापतिपदी तानाजी पांडुरंग पाटील (जाखापूर) यांची बिनविरोध निवड झाली.
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे दिनकर महादेव पाटील (सोनी) यांची, तर उपसभापतिपदी तानाजी पांडुरंग पाटील (जाखापूर) यांची बिनविरोध निवड झाली. सत्ताधारी गटातील सर्व नेत्यांनी एकत्र येत दहा-दहा महिन्यांसाठी सर्वांना संधी देण्याचा निर्णय घेत कोणताही विरोध न होता निवडी पार पडल्या.
निवडीनंतर नूतन पदाधिकाºयांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.मिरजचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, उपसभापती निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या कालावधित सभापतिपदासाठी दिनकर पाटील यांनी, तर उपसभापतिपदासाठी तानाजी पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने बिनविरोध निवडी होणार हे स्पष्ट झाले. सत्ताधारी गटाच्या सर्व नेत्यांनी एकमताने ही निवड केली.
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर सर्व संचालक पंधरा दिवसांपूर्वी सहलीवर गेले होते. बुधवारी सायंकाळी सर्व पन्हाळा येथे होते, तर गुरुवारी सकाळी सांगलीत दाखल झाले. या कालावधित सत्ताधारी गटाचे नेते आ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जयश्रीताई पाटील, विक्रम सावंत आदींनी चर्चा करून मदन पाटील यांचे समर्थक दिनकर पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
ही निवड दहा महिन्यांसाठी असून, त्यानंतर जत तालुक्याला संधी देण्यात येणार आहे. तर त्यापुढील दहा महिन्यांसाठी मिरजेला संधी देण्यात येणार असल्याचे संचालकांनी सांगितले.गेल्यावेळी सत्ताधारी गटातच बेबनाव निर्माण झाल्याने तणावात निवडी झाल्या होत्या. आता मात्र खेळीमेळीच्या वातावरणात निवडी पार पडल्या.
विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या घोरपडे गटाचे संचालक यावेळी उपसभापतिपदासाठी तानाजी पाटील यांना सूचक आणि अनुमोदक म्हणून हजर होते. दिनकर पाटील यांना सूचक म्हणून देयगोंडा बिरादार, तर अनुमोदक म्हणून माजी सभापती प्रशांत शेजाळ यांनी स्वाक्षरी केली.निवडीनंतर खा. संजयकाका पाटील, माजी आ. दिनकर पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
१०-१० चा फॉर्म्युला
विद्यमान संचालक मंडळाला अजूनही तीन वर्षांचा कालावधी मिळणार असल्याने व सर्व संचालकांना पदावर संधी देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार विद्यमान निवडी या १० महिन्यांसाठी झाल्या आहेत. पुढील दहा महिन्यांसाठी जत तालुक्याला, तर त्यानंतर मिरज तालुक्याला संधी देण्यात येणार आहे. बाजार समितीवर निवडून आलेल्या प्रत्येक संचालकाला कामाची संधी मिळावी म्हणून हा फॉर्म्युला असल्याचे सत्ताधारी गटाचे नेते विक्रम सावंत यांनी सांगितले.
पारदर्शक कारभाराला प्राधान्य : पाटील
नूतन सभापती दिनकर पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात विद्यमान संचालक मंडळाने अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. यापुढेही बाजार समितीतील शेतकरी, व्यापारी, हमाल यासह सर्व घटकांना विचारात घेऊनच कारभार केला जाईल. पणन मंडळाकडून मार्गदर्शन मागवून बाजार समितीच्या उत्पन्न वाढीला प्राधान्य देणार आहे. यापुढे पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असून, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गटबाजी व राजकारण बाजूला ठेवून माझी सभापतीपदी निवड केली आहे.
गटतट विसरून निवडी : संजयकाका पाटील
सभापती निवडीची प्रक्रिया सुरू असताना खा. संजयकाका पाटील उपस्थित होते. निवडीनंतरही त्यांच्याच हस्ते नूतन पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शेतकºयांचा विकास केंद्रबिंदू मानून सर्व गटतट विसरून या निवडी करण्यात आल्या आहेत. गेल्या निवडीवेळी काही अडचणीचे प्रसंग आणण्यात आले. मात्र, पक्षविरहीत निवडी झाल्या आहेत.