सांगली बाजार समितीमध्ये बिराजदार अपात्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:49 PM2017-12-13T23:49:49+5:302017-12-13T23:51:58+5:30
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे अपील पणन संचालकांनी फेटाळले.
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपात्र संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात सुगलाबाई शिवगोंडा बिराजदार यांचे अपील पणन संचालकांनी फेटाळले. त्यांचे संचालकपद अपात्र ठरवण्याची जिल्हा उपनिबंधकांनी केलेली कारवाई कायम ठेवण्याचा निर्णय पणन सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी दिला. या निर्णयातून सत्ताधारी संचालकांनी बाजी मारली असली तरी, बिराजदार यांना पणन मंत्र्यांकडे अपील करता येणार आहे.
महाराष्ट्र कृषी खरेदी-विक्री अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सलग सहा सभांना काँग्रेसमधील दुसºया गटाचे नेते विशाल पाटील समर्थक सुगलाबाई बिराजदार गैरहजर राहिल्याने संचालकपद रद्द करण्याची तक्रार स्वीकृत संचालक दादासाहेब कोळेकर यांनी जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्याकडे केली होती. बाजार समिती सभापती निवड २३ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यावेळी संचालकांची पळवापळवी आणि राजकीय कुरघोड्या झाल्या होत्या. तेव्हा बिराजदार यांचे संचालक पद रद्द व्हावे, यासाठी त्यांना संचालक मंडळाच्या सभेला उपस्थित राहू दिले नव्हते. त्यांच्या गैरहजेरीबद्दल त्यांचे संचालक पद रद्द करण्यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न झाले होते.
जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार बाजार समिती संचालक मंडळाच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्याने बिराजदार यांचे संचालक पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. या कारवाईविरोधात न्याय मागण्यासाठी बिराजदार यांनी पणन संचालकांकडे अपील केले होते. त्यावर सहसंचालक सुर्वे यांनी दिलेल्या निर्णयामध्ये दि. ५, २३ आणि ३० नोव्हेंबर २०१६ या तीन सलग सभांना गैरहजर राहिल्या असल्याचे म्हटले आहे. बिराजदार यांनी तीन सभांना गैरहजर राहण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्या सभेसाठी बाजार समितीत आल्या होत्या, परंतु त्यांचे अपहरण झाले, त्याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात आहे. मात्र न्यायालयाने कोणताही मनाई आदेश दिलेला नाही. त्यामुळे युक्तिवादाचा विचार करता येणार नाही.
बाजार समितीच्या सलग तीन सभांना गैरहजर राहिल्यास सभापती, उपसभापती आणि सदस्य यांचे सभासदत्व रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार अपात्र संचालिका बिराजदार यांचे अपील फेटाळण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधकांनी १७ जानेवारी रोजी संचालक अपात्रतेचा निर्णय कायम ठेवण्यात येत असल्याचे पणन सहसंचालकांच्या आदेशात म्हटले आहे.
विरोधकांना मोठा धक्का
सुगलाबाई बिराजदार यांचे संचालकपद अपात्र झाल्यामुळे बाजार समितीमध्ये विरोधी गटाची संख्या एकने कमी झाली आहे. यामुळे पदाधिकारी बदलामध्ये विरोधकांच्या भूमिका काय असणार, याकडे सत्ताधाºयांचे लक्ष लागून राहिले आहे.