गणेशोत्सवासाठी सांगलीची बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:03 AM2017-08-24T00:03:13+5:302017-08-24T00:03:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणरायाच्या आगमनाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने सांगलीच्या बाजारपेठेत उत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. सांगलीच्या मारुती रोड, बालाजी चौक, हरभट रोडवर उत्सवासाठी लागणाºया साहित्याचे स्टॉल्स सजले असून उत्सवाच्या उत्साहाला आता बहर आला आहे.
शुक्रवारी घरोघरी आणि मंडळांच्या गणपतीचे आगमन होणार असल्याने, गणेशमूर्ती विक्री स्टॉलना भेट देऊन मूर्तींचे बुकिंग सुरू आहे. शहरात सर्वत्रच गणेशमूर्ती विक्री होत असून, पुष्पराज चौकात साठहून अधिक स्टॉलवर मूर्ती उपलब्ध आहेत. मारुती रोड, स्टँड रोड, गावभाग याठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल्स् सजले आहेत. यंदा शाडूच्या मूर्तींनाही अधिक मागणी आहे. मागणीच्या तुलनेत यंदा शाडूच्या मूर्तींची संख्या कमी आहे. गतवर्षीही असाच तुटवडा जाणवत होता. सार्वजनिक मंडळांकडून सहा फुटापेक्षा जास्त किंवा बैठ्या, पण आकर्षक मूर्तीला पसंती मिळत आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मोठ्या मूर्तींचे बुकिंग पंधरा दिवस अगोदरच झाले आहे.
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने त्याच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. सांगलीच्या मारुती रोडवर रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागीही मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी याठिकाणी दिसत आहे. आरास साहित्य, धूप, अगरबत्तीसह पूजेचे साहित्य, फळे, तयार नैवेद्य, फुले अशा विविध वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी उपलब्ध आहेत. एकाचवेळी सर्व खरेदी करणे याठिकाणी शक्य असल्याने बुधवारी सकाळपासून मारुती रोडवर खरेदीसाठी गर्दी झाली होती.
गणेशमूर्तींचे स्टॉल शहरातील प्रमुख बाजारपेठेसह विश्रामबाग, शंभरफुटी रस्ता, मारुती रोड, माळबंगला परिसर याठिकाणीही उभारण्यात आले आहेत. त्यात सर्वात जास्त साठहून अधिक स्टॉल पुष्पराज चौकात सांगली-मिरज रस्त्यावर उभारण्यात आले आहेत. हे स्टॉल स्थानिक मूर्तिकारांबरोबरच तासगाव, इचलकरंजी, कºहाडसह शेजारच्या कर्नाटकातील मूर्तिकारांचेही आहेत. राजस्थानी कलाकारांनीही शहराच्या विविध भागात मूर्तींचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलवर पारंपरिक पध्दतीच्या मूर्तींना मागणी आहे. प्लॅस्टर आॅफ पॅरिस आणि शाडूच्या मूर्ती तेथे उपलब्ध आहेत.
फुलांना आला भाव
बाजारात बुधवारी झेंडू, शेवंतीची फुले ५0 रुपयांना पावकिलो या दराने म्हणजेच २00 रुपये किलो दराने विकली जात होती. पण फुलांची आवक कमी असून मागणी अधिक आहे. दर जास्त मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
गणरायाच्या आगमनाचा मुहूर्त
राहू काळात गणरायाची प्रतिष्ठापना टाळण्याचा सल्ला काही ठिकाणी दिला जात असताना, गणरायाच्या आगमनाला मुहूर्ताची आवश्यकता नसल्याचे अनेक ज्योतिष तज्ज्ञांकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रतिष्ठापनेच्या मुहूर्ताबाबत वेगवेगळी मते दिसून येत आहेत.