सांगली मार्केट यार्ड दहा दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:43 AM2021-05-05T04:43:07+5:302021-05-05T04:43:07+5:30
सांगली : सांगली मार्केट यार्डातील अनेक व्यापारी कोरोनाबाधित झाले आहेत. अन्य जिल्हा, राज्यातून व्यापारी, शेतकरी येत असून, रुग्णांची संख्या ...
सांगली : सांगली मार्केट यार्डातील अनेक व्यापारी कोरोनाबाधित झाले आहेत. अन्य जिल्हा, राज्यातून व्यापारी, शेतकरी येत असून, रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दि. ६ ते १५ मेपर्यंत सांगली मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी, जिल्हा हमाल पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्ह्यात दररोजची कोरोना रुग्णांची संख्या तेराशेवर पोहोचली आहे. बळींची संख्याही रोज वीस ते तीसपर्यंत आहे. यार्डातील व्यापाऱ्यांचाही कोरोनामुळे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हमाल पंचायत आणि सांगली चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दि. ६ ते १५ मे या कालावधीत शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. धान्य, बेदाणा, हळद, गूळ विक्रेत्यांसह सर्व दुकानदारांनी बंदला पाठिंबा दिला आहे. हमाल, तोलाईदार यांची सहमती असल्यामुळे शंभर टक्के लॉकडाऊन होणार आहे, असे व्यापारी, हमाल पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
सध्या कडक निर्बंध असतानाही मार्केट यार्डात गर्दी होत आहे. कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे हमाल, तोलाईदारांच्या आरोग्याचा विचार करूनच शंभर टक्के काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी येत्या गुरुवारपर्यंत व्यवहार सुरू राहतील.
- विकास मगदूम, सरचिटणीस, जिल्हा हमाल पंचायत.
कोट
शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गर्दी वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठवडाभर शंभर टक्के व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी आठवडाभर शेतीमाल मार्केट यार्डात आणू नये.
- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली.
चौकट
गूळ व्यापार आजपासून बंद
कोरोनाची साखळ तोडण्यासाठी सांगली मार्केट यार्डातील गूळ व्यापाऱ्यांनी दि. ४ ते ११ मे या कालावधीत व्यापार शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गूळ व्यापार असोसिएशनने ही माहिती दिली आहे.