सांगली : एम.सी.ई.डी. मार्फत इस्लामपूर येथे १५ मार्चपासून उद्योजकता विकास प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 04:30 PM2018-03-07T16:30:55+5:302018-03-07T16:30:55+5:30
एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सांगली : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट शासनाची उद्योजक घडवणारी प्रशिक्षण संस्था आहे. जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरूण युवक-युवती यांना उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण देवून शासकीय योजनाव्दारे स्वयंरोजगार व उद्योगाबद्दल प्रोत्साहन देत असते.
या अनुषंगाने एम.सी.ई.डी. सांगली मार्फत उरूण इस्लामपूर येथे एक महिना कालावधीचा अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०१८ असून दिनांक १५ मार्च २०१८ पासून प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी ए. एम. खडककर यांनी दिली.
खडककर म्हणाले, या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वत:चा उद्योग व स्वयंरोजगार करण्यास इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरूण, तरूणींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग संधीची निवड प्रक्रिया, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, तसेच उद्योग व्यवसायास सहाय्यक करणाऱ्या विविध शासकीय विभागाच्या योजनांची माहिती, मालाचे मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन, उद्योग आधार नोंदणी इत्यादी अधिकारी वर्गाव्दारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच फळ प्रक्रिया, शेतीमाल प्रक्रिया, दूध उत्पादन व प्रक्रिया, शेळीपालन, कुक्कुट पालन, रेशीम उत्पादन व इतरही अनेक उद्योग व्यवसाय संधीबाबत तज्ज्ञ व्यक्तीव्दारा मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारास उद्योग व्यवसाय उभारण्याची तीव्र इच्छा असावी. उमेदवार किमान दहावी पास व १८ ते ४० वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवारांनी आधारकार्डची सत्यप्रत, शैक्षणिक मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला याच्या सत्यप्रती घेवून प्रवेश अर्ज सादर करावा.
प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अस्मिता आर. कोंडुसकर, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली, अक्षर कॉलोनी रोड नं. 9, कामेरी रोड इस्लामपूर येथे संपर्क साधावा.