क्रांतिकारी घटनांच्या स्मारकासाठी सांगलीतून हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:24 AM2018-07-25T00:24:26+5:302018-07-25T00:24:29+5:30
सांगली : क्रांतिकारी घटनांच्या स्मृती जपताना त्या नव्या पिढीसमोर प्रभावी माध्यमातून मांडण्यासाठी सांगली, हरिपूर परिसरात प्रेरणादायी स्मारक उभारले जावे, अशी मागणी मंगळवारी हरिपूर येथील ग्रामस्थ व काँग्रेस सेवा दलाच्यावतीने करण्यात आली. २४ जुलै १९४३ च्या क्रांतिकारकांच्या जेल फोडण्याच्या घटनेला मंगळवारी ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
ब्रिटिशांविरोधातील लढ्याच्या थरारक घटनांच्या पाऊलखुणा जिल्'ाने जपल्या असल्यामुळे क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून जिल्'ाची ओळख सर्वत्र होत असते. वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटताना २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडून पलायन केले होते. क्रांतिकारकांच्या इतिहासातील ही एक मोठी घटना होती. यंदा या घटनेचा अमृतमहोत्सव होत असताना, नव्या पिढीला हा इतिहास कळावा म्हणून एकही स्मारक याठिकाणी उभारले गेले नाही. यावर ‘लोकमत’मध्ये रविवारी २२ जुलै रोजी ‘जागर’ या सदरात प्रकाशझोत टाकण्यात आला होता. त्याची दखल घेत मंगळवारी हरिपूर व सांगली येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहतानाच, स्मारक उभारणीसाठी हाक देण्यात आली.
जायंटस् ग्रुप आॅफ प्रेरणा सहेली व राजे प्रतिष्ठान हरिपूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हरिपूरमधील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे व बाबूराव जाधव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच विकास हणबर, पोलीसपाटील उमाकांत बोंद्रे, अमित वाडकर, संतोष कुरणे, ओंकार शेरीकर, केतन मोडके, नीलेश शेरीकर, गणेश कांबळे, वैशाली माने, सुनीता शेरीकर, सुचेता हरळीकर, सुभद्रा गुरव, अनुसया महाजन उपस्थित होते.
काँग्रेस सेवा दलातर्फेही कार्यक्रम घेण्यात आला. येथील कारागृहासमोरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती स्तंभास वसंतदादांचे सहकारी स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुकुमार पत्रावळे यांच्यासह पत्रावळे कुटुंबीय तसेच सेवा दलाचे मुख्य संघटक अजित ढोले, प्रमोद लाड उपस्थित होते. त्यानंतर सेवा दलातर्फे आमराईजवळील हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
‘लोकमत’ने केला जागर
‘लोकमत’मधील ‘जागर’ सदरात २४ जुलै १९४३ च्या घटनेला उजाळा देतानाच स्मारक उभारणीच्या प्रलंबित मागणीवरही प्रकाशझोत टाकण्यात आला होता. मंगळवारी सामाजिक संघटना, सेवा दल यांच्यावतीनेही याबाबतची मागणी करून पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटना पदाधिकाºयांनी यावेळी ‘लोकमत’ने केलेल्या जागृतीबद्दल धन्यवादही दिले.
स्वातंत्र्यसैनिकांचा स्फूर्तिदायी इतिहास नव्या पिढीला कळावा यासाठी सांगलीमध्ये स्मारक उभारणीबाबत ‘लोकमत’ने ‘जागर’मधून केलेली जागृती महत्त्वाची आहे. आमराई उद्यानाला हुतात्मा पत्रावळे यांचे नाव देण्याबरोबरच याच उद्यानात मागील बाजूस सचित्र इतिहास, त्यासंदर्भातील माहितीपर नकाशे, स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा, पुस्तके अशा माध्यमातून स्मारक करावे. हरिपूरलाही त्याचपद्धतीचे स्मारक झाले पाहिजे. आम्ही यासाठी पाठपुरावा करू.
- अजित ढोले, मुख्य संघटक, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल