सांगली : सटवाजीराजे डफळे यांचे स्मारक उजेडात, डफळापुरात समाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:08 PM2018-05-14T13:08:51+5:302018-05-14T13:08:51+5:30
शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.
जत : शिवकालीन सरदार आणि जत जहागीरीचे मूळ संस्थापक सटवाजीराजे डफळे यांची डफळापूर (ता. जत) येथील समाधी उजेडात आली आहे. उमराणी (ता. जत) येथील जहागीरदार अमरसिंहराजे डफळे यांच्या प्रयत्नातून व इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर (मिरज) यांच्या अभ्यासातून या शूर योध्याच्या स्मृतीस्थळाला उजाळा मिळाला आहे. या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी केला आहे.
शिवकाळातील प्रसिद्ध योध्दे सटवाजीराजे डफळे यांची समाधी डफळापूर येथील सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात असल्याची माहिती उमराणीचे जहागीरदार अमरसिंह डफळे यांना मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करुन माहिती घेतली.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांनीही या समाधीस्थळाचा अभ्यास केला. बांधकाम शैली आणि भव्यता पाहून ही प्रसिद्ध व्यक्तीचीच समाधी असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. घराण्यातील अन्य व्यक्तींचा अभ्यास केला असता, ही समाधी सटवाजीराजे डफळे यांचीच असल्याची खात्री झाली आहे.
डफळापूरच्या उत्तर बाजूस बेळुंखी रस्त्यालगत गावात प्रवेश करताना सुभाषराव गायकवाड यांच्या शेतात ही समाधी आहे. गायकवाड घराणे हे डफळे घराण्याचे नजीकचे आप्त आहेत. त्यांनी आजवर या समाधीचे जतन करून ठेवले आहे. या समाधीचा जीर्णोद्धार करण्याची संकल्पना डफळे आणि गायकवाड कुटुंबियांनी मांडली. त्यानुसार एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन समाधीच्या सभोवताली असणारी काटेरी झुडपे काढण्यात आली. त्यामुळे आता हा परिसर स्वच्छ दिसत आहे.
या कार्यक्रमासाठी अमरसिंह डफळे, सुभाषराव गायकवाड, रमेश गायकवाड, सुरेशराव डफळे, विक्रमसिंह डफळे, बाळासाहेब गायकवाड, धैर्यशीलराव डफळे, संग्रामसिंह डफळे, राहुल डफळे, खर्डेकर सरकार, अमरसिंह इंगोले, बाप्पासाहेब डफळे, जयवंतराव डफळे, मोहनराव गायकवाड, रमेश शिंदे, वसंतराव चव्हाण, परशुराम चव्हाण उपस्थित होते.
पराक्रमी सटवाजीराजे
सटवाजीराजे डफळे हे पराक्रमी योध्दे होते. अदिलशहाने त्यांना जत, करजगी आणि कर्नाटकातील होनवाड, बारडोल या चार गावांचे देशमुखी वतन दिले होते. त्या काळातील अनेक लढायात त्यांनी पराक्रम गाजवला होता. मोगल काळातही त्यांना नवीन वतने मिळाली होती. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या.