म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: मृत्युकांडानंतर रडायलाही कुणी उरलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:38 PM2022-06-21T13:38:13+5:302022-06-21T13:38:45+5:30

भावा-भावांत मरेपर्यंत सुसंवाद, जिल्ह्यातील सर्वात मोठे मृत्युकांड

Sangli Mhaisal Mass Suicide Case: The challenge of investigation is before the police administration as the highly educated and affluent family ended their life at the same time | म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: मृत्युकांडानंतर रडायलाही कुणी उरलं नाही!

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: मृत्युकांडानंतर रडायलाही कुणी उरलं नाही!

googlenewsNext

संतोष भिसे/सुशांत घोरपडे

सांगली-म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या आत्महत्येने रडायलाही रक्ताचे कोणी उरले नाही. उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबाने एकाच वेळी जीवनयात्रा संपविल्याने पोलीस प्रशासनापुढे तपासाचे आव्हान दिसत आहे. डॉ. माणिक आणि पोपट यल्लाप्पा वनमोरे यांनी कुटुंबासह केलेल्या आत्महत्येमागे कर्ज, सावकारांकडून त्रास, करणी-धरणी, अविचारी गुंतवणूक अशी अनेक कारणे चर्चेत असली, तरी पोलीस अधिकारी घटनास्थळी काहीही बोलत नव्हते.

वनमोरे यांची दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित आणि सधन होती, त्यामुळेही घटनेमागील कारणांविषयी मोठी चर्चा सुरू होती. घटनास्थळावरील दृश्य विदारक होते. बँकेत नोकरी करणारी पोपट यांची मुलगी अर्चना शनिवारीच कोल्हापुरातून आजीसह घरी परतली होती. रविवारी रात्री झोपण्याच्या कपड्यात असतानाच तिला विषाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे ती स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली व तेथेच कोसळली असावी.

पोपट यांचा मृतदेह हॉलमध्ये सोफ्याजवळ पडला होता, तर पत्नी संगीता बेडरूममध्ये पडल्या होत्या. अर्चनाची स्थिती पाहता विषप्रयोगाविषयी तिला माहिती नसावी अशी शक्यता आहे. डॉ. माणिक यांच्या घरातही मुले आदित्य, प्रतिमा आणि शुभम यांना याची कल्पना नसावी, असे चित्र होते. सोमवारी दुपारी घटना समजल्यानंतर भावकीतील महिलांचा बंगल्याबाहेर आक्रोश सुरू होता.

डॉ. माणिक म्हैसाळ पंचक्रोशीत जनावरांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध होते. गावात सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर होता. एका पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक होते. वडिलार्जीत दोन एकर शेती काही वर्षांपूर्वीच विकली होती. जुन्या घरात आई आक्काताई राहायची, तर दोन्ही भाऊ कुटुंबासह आपापल्या बंगल्यात राहायचे. आक्काताई तेथेही राहायला जायच्या. त्या काही दिवसांपूर्वी नात अर्चनाच्या सोबतीला म्हणून कोल्हापुरात गेल्या होत्या. आता कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्याने यल्लाप्पा वनमोरे यांचा निर्वंश झाला आहे.

चित्रकलेच्या शिक्षकाने जीवनात रंग भरलेच नाहीत

पोपट वनमोरे बेडग (ता. मिरज) येथे रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. आष्टा येथून सहा-सात वर्षांपूर्वी बदलून आले होते. विद्यार्थ्यांना बालमानसशास्त्राचे धडेही द्यायचे. शाळेत विद्यार्थ्यांपुढे चित्रात रंग भरणाऱ्या पोपट यांना स्वत:च्या आयुष्यात मात्र रंग फुलविता आले नाहीत.

‘योग’ कशाचा?

म्हैसाळमध्ये वनमोरे भावकीची सुमारे साठ-सत्तर घरे आहेत. पैकी यल्लाप्पा वनमोरे यांची गावात आणि नरवाड रस्त्यावर जुनी घरे होती. कुटुंबाचा विस्तार वाढेल, तसे पोपट आणि डॉ. माणिक यांनी अनुक्रमे शिवशंकरनगर आणि अंबिकानगरमध्ये बंगले बांधले. पोपट यांचा ‘योग’ बंगला टुमदार आहे. घरातील सजावटदेखील कल्पक व आकर्षक आहे. बंगल्याचे योग नाव ॲक्रिलीकमध्ये तयार केले असून रविवारी रात्रीपासून त्यातील दिवा सुरूच होता.

भावा-भावांत मरेपर्यंत सुसंवाद

मोठे पोपट आणि लहान माणिक या भावांत विलक्षण सुसंवाद होता. दोघांची घरे काही अंतरावर असली, तरी दररोजचे येणेजाणे होते. महत्त्वाचे निर्णयदेखील एकत्रच घ्यायचे. जीवनयात्रा संपविण्याचा निर्णयदेखील याच पद्धतीने एकत्रित घेतल्याची चर्चा गावात होती. शुभम आजी आक्काताईला सोडण्यासाठी रात्री चारचाकीतून चुलते डॉ. माणिक यांच्या घरी गेला होता, तो परतलाच नाही.

जिल्ह्यातील सर्वात मोठे मृत्युकांड

आसंगी तुर्क (ता. जत) येथे २००२ मध्ये पाच जणांना जाळून मारण्यात आले होते. आरग (ता. मिरज) येथे २००६ मध्ये गाडे कुटुंबातील सहा जणांची हत्या झाली होती. त्यानंतर म्हैसाळमधील वनमोरे मृत्युकांड सर्वात मोठे ठरले आहे.

Web Title: Sangli Mhaisal Mass Suicide Case: The challenge of investigation is before the police administration as the highly educated and affluent family ended their life at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.