सांगली-मिरज बनली खड्ड्यांची शहरे
By Admin | Published: May 9, 2017 01:14 AM2017-05-09T01:14:10+5:302017-05-09T01:14:10+5:30
सांगली-मिरज बनली खड्ड्यांची शहरे
शीतल पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्र खड्डेमुक्त होईल, अशी भाबडी आशा घेऊन सांगलीकर गेली कित्येक वर्षे रस्त्यांच्या दुर्दशेकडे पाहून जगत आहेत. पण महापालिकेत कितीही सत्ताबदल झाले, आयुक्त बदलले तरी, नागरिकांच्या नशिबी खड्डेमय रस्तेच ठरलेले असतात. त्याचा प्रत्यय यावर्षीही नागरिकांना येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, त्यांच्या दुरुस्तीला पालिकेतील सत्ताधारी व अधिकाऱ्यांना मुहूर्तच मिळेनासा झाला आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते काळे करण्याचा उद्योग सुरू असला तरी, तो वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यातही नागरिकांना खड्ड्यांतूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे.
महापालिका हद्दीतील काही अंतर्गत रस्त्यांची सुधारणा झाली असली तरी, मुख्य रस्त्याकडे लक्ष देण्यास पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाला वेळच नाही. शहरातील एकही मुख्य रस्ता सुस्थितीत नाही. प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहराच्या मुख्य गावठाण परिसरातील रस्त्यांची तर चाळण झाली आहे. यावरून उपनगरांतील रस्त्यांचा तर केवळ अंदाजच बांधलेला बरा. सांगली शहराची ओळख कधीकाळी नाट्यपंढरी, सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून होती; पण आजकाल ‘खड्डेमय शहर’ अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. आज शहरातील एकसलग मुख्य रस्त्यावर खड्डा नाही, असे शोधूनही सापडणार नाही. शहराच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. चारही दिशांनी शहरात प्रवेश करा, तेथील रस्त्यांवर खड्डेच अधिक आहेत.
सांगली बसस्थानक ते स्टेशन चौक हा शहरातील मुख्य रस्ता. या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, महापालिका, पोलिस ठाणे अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. या रस्त्यावरून जातानाच सांगलीत असल्याचा खरा भास होतो. स्टेशन चौक ते राजवाडा चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. महापालिकेपासून बस स्थानकापर्यंत आणि बस स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रेल्वे अंडरब्रीज ते मंगळवार बाजार या रस्त्यावरचा प्रवास तर जीवघेणाच म्हणावा लागेल. रेल्वे ब्रीज ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत ड्रेनेजसाठी रस्ता खुदाई केली आहे. त्या चरी मुजविल्या असल्या तरी, पुन्हा खड्डे पडले आहेत. होळकर चौकापासून मंगळवार बाजारापर्यंत रस्ता कमी आणि खड्डे अधिक अशी स्थिती आहे. जिल्हाधिकारी बंगला ते आमराई हा रस्ता जीवघेणा बनला आहे. पटेल चौक ते कॉलेज कॉर्नर, पुष्पराज चौक ते सिव्हिल चौक रस्त्यांची चाळण झाली आहे.
आलदर चौक ते स्फूर्ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर आजअखेर कित्येकवेळा पॅचवर्क झाले. तरीही हा रस्ता उखडलेलाच असतो. शंभरफुटी रस्त्याची दुरवस्था तर न पाहण्याजोगी आहे. एका बाजूला डांबरीकरण झाले असले तरी, ड्रेनेजसाठी अनेक ठिकाणी खुदाई झाली आहे. दुसऱ्या बाजूला ड्रेनेज वाहिनीचे काम पूर्ण झाले तरी, रस्ता पूर्ण केलेला नाही. त्यामुळे एकाच बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर रोडला जोडलेल्या ठिकाणी तर वाहन चालविणे म्हणजे एक दिव्य ठरत आहे. एवढे मोठे खड्डे याठिकाणी पडले आहेत. लक्ष्मी देऊळ परिसरातही खड्डेमय रस्त्यांचा अनुभव येतो. विश्रामबाग परिसरात पुन्हा केबलसाठी रस्ते खुदाई केल्याने रस्ते उखडले आहेत. सावरकर कॉलनी परिसरातील रस्ते ड्रेनेजमुळे अस्तित्वहीन झाले आहेत. शामरावनगर, त्रिमूर्ती कॉलनी अशा उपनगरांतील रस्त्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. त्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांचे खड्डेमुक्त शहराचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहणार आहे. स्वार्थी राजकारणाच्या अस्तित्वाचाच हा परिणाम असल्याची भावना आता व्यक्त होत आहे.
चोवीस कोटींचे गाजर
महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी २४ कोटींचे गाजर सत्ताधाऱ्यांनी दाखविले आहे. पण या रस्त्यांच्या कामांना प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा मोठा फटका बसणार आहे. महापौर हारूण शिकलगार यांनी मोठ्या आशेने या रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा केला. पण पावसाळा तोंडावर आला तरी या रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. एक मेपासून रस्त्यांची कामे सुरू होतील, अशी घोषणा यापूर्वी झाली होती. आता १५ मे चा मुहूर्त काढला आहे. महासभेच्या मान्यतेनंतर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे
मिरज शहर खड्ड्यात!
मिरजेचे नगरसेवक कोट्यवधी रुपयांचा निधी पळवितात, असा आरोप सातत्याने होतो. मग हा निधी जातो कुठे?, असा प्रश्न आहे. मिरजेतील रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. मिरज बसस्थानक ते गांधी चौक, बसस्थानक ते शास्त्री चौक, मिरज मार्केट ते स्टेशन रोड, वंटमुरे कॉर्नर ते स्टेशन रोड, मार्केट ते मालगाव रोड या प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. ाुख्य रस्त्यांची कामे रखडली. निविदा प्रक्रिया, ठेकेदाराशी वाटाघाटी यात बराच कालावधी गेला आहे. आता स्थायी समितीसमोर दर मान्यतेसाठी हा विषय आणला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर तरी प्रशासनाकडून गतीने कामे होतील, अशी अपेक्षा करणे सध्या तरी स्वप्नच वाटत आहे.
खराब रस्त्यांचा काँग्रेस नेत्यांना फटका
महापालिकेतील खराब रस्त्यांचा फटका राजकीय नेत्यांनाही बसला आहे. २०१३ मध्ये महापालिकेत सत्ता येताच मदन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून २० कोटींचा निधी आणला होता. या निधीतून शहरातील काही रस्त्यांची कामे प्रस्तावित होती. पण ही कामे वर्षभरात होऊ शकली नाहीत. त्याचा फटका विधानसभेला बसला. विधानसभा निवडणुकीत खड्डेमय रस्त्यांबद्दल नागरिकांच्या मनात सुप्त असंतोष होता, तो मतपेटीद्वारे व्यक्त झाला आणि मदन पाटील यांचा पराभव झाला.