सांगली, मिरज सिव्हील गरिबांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:25 AM2021-04-25T04:25:35+5:302021-04-25T04:25:35+5:30
सांगली : सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात गंभीर आजाराच्याही शस्त्रक्रिया मोफत होत असल्यामुळे सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्हे आणि ...
सांगली : सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात गंभीर आजाराच्याही शस्त्रक्रिया मोफत होत असल्यामुळे सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्हे आणि कर्नाटकातील शेकडो रुग्ण रोज दाखल होत आहेत. या रुग्णांसाठी सांगली, मिरज सिव्हील रुग्णालय म्हणजे जीवनदायीच म्हणावी लागेल.
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेले रुग्णालय असून सुरुवातीला सांगली संस्थानमार्फत सार्वजनिक रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) या नावाने चालू होते. २५ जानेवारी १९५५ रोजी सांगली संस्थानकडून हस्तांतरित होऊन महाराष्ट्र शासनातर्फे हे शासकीय रुग्णालय चालू आहे. १९५५ ते १९६३ पर्यंत हे रुग्णालय राजवाडा चौक सांगली येथे चालू होते. सांगली संस्थानकडून ताब्यात घेताना केवळ १०६ खाटांचे (बेड) हे रुग्णालय होते. रुग्णांची संख्या व गरज ओळखून वेळोवेळी बेडची वाढ होऊन १९७७ मध्ये ३८० बेड करण्यात आली. सध्या या रुग्णालयात बेडची संख्या ३८८ झाली आहे. हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या संस्थेशी संलग्न आहे. या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक कक्ष, परिचारिका वसतिगृह, भाजलेल्या रुग्णांसाठी कक्ष, क्षयरोग, नेत्र, संसर्गजन्य, रक्तपेढी आदी २९ विभाग कार्यरत आहेत. अत्यंत नाममात्र शुल्कात उत्तम दर्जाचे उपचार केले जात असल्यामुळे सांगली जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत आहेत. याच धर्तीवर मिरज शासकीय रुग्णालयातही उपचार होत आहेत. यामुळे येथेही उपचारासाठी रुग्ण संख्या मोठी दाखल होत आहे.
चौकट
सांगली सिव्हीलमधील पदे
-प्राध्यापक संख्या : ४८
-असोसिएट प्राध्यापक : ३०
-निवासी डॉक्टर ५०
-अधिपरिचारिका : २५३