सांगली-मिरजेत घुमला विठुनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:33 PM2019-07-12T23:33:25+5:302019-07-12T23:46:11+5:30
शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरात कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गणेश मंगल कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.
सांगली : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या सांगलीकरांनी शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होती. शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरात कीर्तनासह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
स्टेशन रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात शैलेश शितोळे व जया शितोळे यांच्याहस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, खजिनदार आर. डी. पवार, श्रीकांत चोपडे, दिलीप सूर्यवंशी, भास्कर वाघ पुजारी, सागर घोडके, उमेश वार्इंगडे, दत्तात्रय चोपडे, नारायण गायकवाड आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी सागर घोडके यांच्यावतीने भाविकांना लाडू, केळी, खजुराचे वाटप करण्यात आले.
मारुती रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची लगबग होती. कर्नाळ रस्त्यावरील नामदेव मंदिरात यंदा विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेविका स्वाती शिंदे आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. पहाटे महापूजेनंतर दिवसभरात महिला मंडळातर्फे हरिपाठ वाचन, जप, तसेच सायंकाळी बाळकृष्ण मुळे यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच येथील गणेश मंगल कार्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ‘पांडुरंगी मन रंगले’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.
यासह शहरातील उपनगरांतील मंदिरांमध्येही कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांच्या गर्दीने मंदिरे फुलून गेली होती.
उपवासाच्या : पदार्थांना मागणी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरात उपवासाच्या पदार्थांची चांगली विक्री झाली. यंदा सर्वच पदार्थांच्या किमती वाढल्या होत्या. त्यात खजूर, रताळांची चांगली विक्री झाली. फळांनाही मागणी होती. ओल्या शेंगा, रताळी, बटाट्यांना मागणी होती. तसेच उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या वाघाट्यांनाही बाजारात मागणी होती.