सांगली-मिरजेत महापालिका शाळा सलाईनवर
By Admin | Published: January 3, 2016 11:40 PM2016-01-03T23:40:41+5:302016-01-04T00:32:15+5:30
विद्यार्थी संख्येत मोठी घट : इंग्रजी शाळांच्या स्पर्धेमुळे वाताहत; दर्जा सुधारण्याचे आव्हान
सदानंद औंधे --मिरज --महापालिकेच्या सांगली-मिरजेतील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असून, विद्यार्थी नसल्याने अनेक शाळा बंद पडत आहेत. बंद शाळांच्या इमारतींचा अन्य कारणांसाठी वापर करण्याचा नगरसेवकांचा आग्रह आहे. यामुळे महापालिका शाळा आणखी काही वर्षात इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेच्या सांगलीत ३० व मिरजेत २२ मराठी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या प्राथमिक शाळा आहेत. १० वर्षांपूर्वी महापालिका प्राथमिक शाळांत सुमारे १२ हजार विद्यार्थी होते. सध्या ५२ शाळेत केवळ ५५०० विद्यार्थी आहेत. दरवर्षी विद्यार्थी संख्येत घट होत असल्याने महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी काही शाळांत केवळ २५ ते ५० एवढेच विद्यार्थी आहेत. १० वर्षांपूर्वी महापालिकेकडे सुमारे पाचशे शिक्षक होते. विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षकांची संख्याही १६० वर आली आहे. महापालिका शाळांत गेल्या काही वर्षात शिक्षकांच्या ८० जागा रिक्त होत्या. मात्र विद्यार्थी कमी होत असल्याने रिक्त जागांची संख्या ४० वर आली आहे. येत्या काही वर्षात सध्या असलेले शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. मिरजेपेक्षा सांगलीत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या आणखीनच कमी आहे. गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा व महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा, साधनांची कमतरता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. खासगी शाळा व इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत महापालिका शाळांची वाताहत झाली आहे. विद्यार्थी नसल्याने मिरजेत पाच शाळा बंद पडल्या आहेत. उर्वरित अनेक शाळा सलाईनवर असल्याचे चित्र आहे. बंद पडलेल्या शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, या शाळा इमारतीचा अन्य कारणांसाठी वापर करण्याची मागणी नगरसेवक करीत आहेत. कमानवेस येथील महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून, या शाळेच्या इमारतीत समाज मंदिर सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. कुपवाड रस्त्यावर शाळा क्रमांक २४ बंद पडल्यानंतर तेथे गांधी चौक पोलीस ठाणे सुरु करण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही शाळा इमारतींचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर सुरू करण्याची मागणी आहे. शाळा इमारतीचा वेगळा कारणासाठी वापराचा निर्णय झाल्यास महापालिका प्राथमिक शाळा इतिहासजमा होणार आहेत.
शैक्षणिक दर्जावर परिणाम
इंग्रजी शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी महापालिका शाळेत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात शिक्षण सुरू केल्यास विद्यार्थ्यांची गळती रोखता येणे शक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका शाळांकडे साधने व सुविधांची कमतरता आहे. शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे केंद्रप्रमुख या पदाप्रमाणे महापालिका शिक्षण मंडळाकडे प्रशासन अधिकाऱ्यांशिवाय शिक्षकांवर नियंत्रण ठेवणारा अधिकारी नाही. केंद्र समन्वयक ही प्रतिनियुक्तीवरील पदे रद्द करण्यात आली आहेत. त्यांचाही शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे.
शिक्षकांच्या विनवण्या : पालकांची नकारघंटा
सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला बालवाडी प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळांऐवजी नामवंत खासगी शाळांत प्रवेशासाठी रस्सीखेच आहे. मराठीपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पालकांची अधिक पसंती असल्याने देणग्या देऊनही इंग्रजी शाळांत प्रवेश घेण्यात येत आहे. मिरजेत इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांतील बालवाडी प्रवेश क्षमता सुमारे बाराशेवर आहे. मात्र इंग्रजी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट आहे. तसेच महापालिका शाळांतील शिक्षक बालवाडी प्रवेशासाठी पालकांना विनवणी करीत आहेत.