सांगली-मुंबई बसला २९ टक्केच प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:26 AM2021-03-27T04:26:25+5:302021-03-27T04:26:25+5:30
सांगली : जिल्ह्यातील दहा आगारातील ६२० बसेसच्या राज्यभरातील मार्गावर सहा हजार ४०० फेऱ्या होत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच ...
सांगली : जिल्ह्यातील दहा आगारातील ६२० बसेसच्या राज्यभरातील मार्गावर सहा हजार ४०० फेऱ्या होत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच फेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे पुन्हा एसटीचा प्रवास सुरळीत चालू होता. जानेवारी, फेब्रुवारी २०२१ मध्ये तर चार हजार २०० फेऱ्या सुरू होत्या. पण, मागील २० दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे एसटी बसचे रिझर्वेशन केवळ २६ ते ३० टक्केपर्यंतच होत आहे. एक हजार ४०० बसेसच्या फेऱ्या प्रशासनाने बंद केल्यामुळे सध्या केवळ दोन हजार ८०० बसेसच्या फेऱ्या चालू आहेत.
सांगली जिल्ह्यातून रोज ६२० बसेस धावतात. लॉकडाऊन उठल्यानंतर या बसेसना ६५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी मिळत होते. मात्र, गेल्या २० दिवसांमध्ये प्रवासी घटले आहेत. बाहेरुन येणाऱ्या ४२० बसेसनाही प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे. कोरोना वाढल्यामुळे पुन्हा एकदा एसटीवर संकट आले आहे. कोरोना नियमांचे पालन करून सेवा देण्यात येत असली तरी प्रवासच थांबला आहे. त्यामुळे सध्या एसटी पुन्हा एकदा तोट्यात आली आहे.
चौकट
२४ फेऱ्या बंद
शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा अंतर्गत बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना पासेसही देण्यात आले होते. आजही शाळा-महाविद्यालये सुरू आहेत. पण, विद्यार्थी एसटीकडे येतांना दिसत नाही. तसेच प्रवाशांची संख्याही ७० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे बसेसच्या २४ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. साध्या बसेसनाही जिल्हा अंतर्गत प्रवासी नसल्याने काही मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही अरुण वाघाटे यांनी सांगितले.
चौकट
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
रातराणी तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या पाच ते सहा हजारांच्या आसपास होती. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रवासी संख्या घटली आहे. लॉकडाऊननंतर ७० ते ८० टक्के भारमान होते. मात्र आता या गाड्यांसाठी २६ ते ३० टक्के भारमान आहे.
चौकट
रातराणीच्या केवळ १० बसेस...
सांगली विभागातील दहा एसटी आगारातून रातराणीसाठी केवळ सहा बसेस प्रवाश्यांच्या दिमतीला आहे. मुंबई, चेंबूर, हैद्राबाद या मार्गावर या रातराणी धावत असल्या तरी प्रवासी घटले आहे. केवळ २६ ते २९ टक्के भारमानाने त्या चालविल्या जात आहेत. लॉकडाऊननंतर काही दिवस या गाड्यांना आरक्षण होते. परंतु आता प्रवासीच नसल्याने आरक्षण बंद करण्यात आले आहे.
कोट
लांब पल्ल्यांच्या गाड्यासह जिल्हाअंतर्गत प्रवासी सेवा जोरात सुरू झाली होती. परंतु कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढल्याने प्रवाश्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशी संख्या घटली आहे. जिथे १० प्रवासी मिळत हाेते तिथे ५ प्रवासी मिळत आहे. सर्वच बसेसचे भारमान ६० ते ६५ टक्क्यांनी घटले आहे. यामुळे काही फेऱ्या बंद केल्या आहेत.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सांगली.
चौकट
सांगली बसस्थानकात रोज ६५० बसेसची ये-जा
सांगली बसस्थानकात राज्यासह जिल्ह्यातील विविध आगारातून रोज ६५० बसेसची ये-जा होत आहे. बहुतांशी बसेसमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. काही प्रवासी सांगूनही मास्कचा वापर करत नाही, असे चालक व वाहकांनी सांगितले.