सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त-- केंद्र शासनाकडून घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:42 PM2017-09-08T23:42:17+5:302017-09-08T23:49:37+5:30
सांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र शासनाने सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, केंद्र शासनाकडून विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमावर केंद्र शासनानेही शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगली महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय समितीने सांगली महापालिकेची पाहणी करून हागणदारीमुक्त शहराची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने केंद्र शासनाकडेही शिफारस केली. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय समितीचे रवी रंजन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महापालिकेची पाहणी करून अहवाल शासनाला सादर केला होता. शुक्रवारी केंद्र शासनाकडून हागणदारीमुक्त शहरात सांगली महापालिकेचा समावेश झाल्याचे जाहीर करण्यात आले.
वैयक्तिक शौचालय योजनेलाही गती देण्यात आली. महापालिकेने ४३६६ अर्जाना मंजुरी दिली होती. त्यापैकी ३ हजार ५८८ शौचालयांचे बांधकाम सुरू होते, तर ३ हजार १९९ शौचालये पूर्ण झाली होती. शौचालयांच्या लाभार्थ्यांना ४ कोटी २६ लाख रुपयांचे अनुदानही वाटप करण्यात आले आहे. शौचालय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून १२ हजाराचे अनुदान मिळत होते, तर महापौर हारूण शिकलगार यांनी महापालिकेच्यावतीने आणखी ५ हजाराच्या अनुदानाची घोषणा केली होती. त्यामुळे वैयक्तिक शौचालये बांधण्याकडे नागरिकांचा कल वाढला होता.
जनजागृतीबरोबरच कारवाईचा बडगा...
प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना, तसेच उघड्यावर शौचास जाणाºयांविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने निर्धारित वेळेत हागणदारीमुक्तीचे ध्येय गाठले आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पदभार हाती घेतल्यापासून हागणदारीमुक्त शहरासाठी पाठपुरावा सुरू केला होता. उपायुक्त सुनील पवार व आरोग्य विभागाचे अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कर्मचाºयांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
सई ताम्हणकर स्वच्छतादूत...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने स्वच्छता दूत म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिची निवड केली होती. सई ताम्हणकर हिने तीन दिवस शहराच्या विविध भागात जाऊन स्वच्छतेबाबत जागृती केली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रभागनिहाय गुडमॉर्निंग पथकाद्वारे उघड्यावर शौचास बसणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. गेल्या आठवडाभरात ६८ जणांवर अशी कारवाई करीत त्यांच्याकडून एक लाखाचा दंडही वसूल केला.