Sangli: सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी, विजेच्या खांबावर आदळली कार, प्रकृती स्थिर
By अविनाश कोळी | Published: October 2, 2024 09:42 PM2024-10-02T21:42:35+5:302024-10-02T21:42:54+5:30
Sangli Accident News: कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
- अविनाश कोळी
सांगली - कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्रामबागला गेले होतेे. स्फुर्ती चौकातून गर्व्हमेंट कॉलनीकडे जाताना येथील बसथांब्याजवळ त्यांची गाडी आली. गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी जाऊन रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर आदळली त्यांच्या कारमधील एअर बॅग खुल्या झाल्या, मात्र तरीही आयुक्तांच्या डाेक्याला मार लागला. डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने मिरज रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले.
महापालिकेत अपघाताचे वृत्त धडकताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिस पंचनामा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. गव्हर्मेंट कॉलनीतील रस्त्यावरील हे खांब उंच असल्याने तसेच ते गंजल्याने त्यांचा अंदाज येत नाही. याबाबत अनेकदा महापालिकेत तक्रारीही दाखल झाल्या होत्या, मात्र याठिकाणी सुरक्षा उपाय केले नसल्याने आता महापालिका आयुक्तांनाच या विद्युत खांबामुळे अपघातास सामोरे जावे लागले.
गव्हर्मेट कॉलनीमधील ज्या विद्युत खांबाला आयुक्तांची गाडी धडकली, त्या विद्युत खांबाला रेडियम लावावे, अशा सुचना याआधीच आम्ही महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. या रोडवर विद्युत खांब उंचीवर असल्याने दिव्यांचा प्रकाश कमी आहे. यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे.
- विनायक सिंहासने (माजी नगरसेवक)