सांगलीत राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक भिडले, सभापतींनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले
By शीतल पाटील | Published: August 4, 2023 03:45 PM2023-08-04T15:45:11+5:302023-08-04T15:49:26+5:30
स्थायी समितीचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक सभा सुरू असताना आत शिरले
सांगली : स्थायी समितीचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक सभा सुरू असताना आत शिरले आणि त्यांच्यात रस्त्याच्या कामावरून वाद पेटला. अखेर सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले.
स्थायी समितीची सभा सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अभिजित भोसले सभागृहात आले. त्यांनी खाॅजा वसाहत ते कोल्हापूर रोड या रस्त्याचे काम थांबविण्याची मागणी केली. हारगे सभागृहात गेल्याच कळताच नगरसेवक योगेंद्र थोरातही आले. त्यांनी वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.
मिरजेतील खाँजा वसाहत ते कोल्हापूर रोड या रस्त्यासाठी थोरात यांनी समाजकल्याण निधीतून ५० लाख मंजूर केले आहेत. तर हारगे यांच्या पत्नी नगरसेविका संगीता हारगे यांनी अंदाजपत्रकात निधीची तरतुद केली आहे. दोघांनी आपल्याच निधीतून रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न चालविले होते. त्यातून काही दिवसांपासून दोघांत वाद निर्माण झाला आहे.
या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना निविदा काढण्यात आली आल्याचा मुद्दा हारगे यांनी उचलून धरला आहे. तर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार दिवसांत रस्त्याच्या जागेला महापालिकेचे नाव लागणार असल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने या रस्त्याचा वादही चांगलाच पेटला आहे.