सांगली महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प, सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्प ऑनलाइन सादर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 02:08 PM2022-03-15T14:08:08+5:302022-03-15T14:08:52+5:30
गतवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प ७१० कोटींचा होता.
सांगली : महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती, कोरोनामुळे महसुली उत्पन्नावर झालेला परिणाम अशा परिस्थितीतही ७०० कोटींपेक्षा अधिक रकमेचा प्रस्तावित अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस हे प्रशासनाच्या वतीने अर्थसंकल्प सादर करतील.
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प ऑनलाइन सादर होणार आहे. गतवर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प ७१० कोटींचा होता. यात स्थायी समितीने ५० कोटींची वाढ केली होती. तर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी आणखी २० कोटींची भर घातली होती. त्यामुळे गेल्या वर्षी बजेटने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली होती. यंदाच्या बजेटचे कामही प्रशासनाने पूर्ण केले आहे. लेखा विभागाने अंतिम निर्णयासाठी गत आठवड्यात बजेट आयुक्तांकडे सादर करण्यात आले. बुधवारी स्थायी समितीच्या सभेत आयुक्तांकडून यंदाचे बजेट सादर केले जाणार आहे.
गतवर्षीइतकेच ७०० कोटींच्या आसपास बजेट असल्याचे सांगण्यात येत आहे. यात काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. महसुली खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी बजेटमध्ये उपाययोजना आखल्याचे समजते.