सांगली महापालिकेच्या दणक्याने दोन कोटीची घरपट्टी वसूल
By शीतल पाटील | Published: February 27, 2023 07:59 PM2023-02-27T19:59:12+5:302023-02-27T19:59:32+5:30
याबाबत न्यायालयात वादही सुरू होता.
सांगली : गणपती पेठेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेकडे तीन कोटी रुपयांची घरपट्टी थकीत होती. याबाबत न्यायालयात वादही सुरू होता. अखेर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सोमवारी घरपट्टी विभागाच्या पथकाने बँकेवर जप्तीची कारवाई हाती घेतली. अखेर बँकेकडून दोन कोटी ८ लाख रुपयांची थकबाकी भरून जप्तीची कारवाई टाळण्यात आली.
महापालिकेकडून थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची मोहिम हाती घेतली आहे. कर वसुलीत हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचा इशाराही आयुक्त सुनील पवार यांनी दिला आहे. त्यामुळे सुट्टीदिवशीही घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान गणपती मंदिराजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे २०१८ पासून घरपट्टीची थकबाकी होती. ही थकबाकी ३ कोटी ७ लाख ५१ हजारापर्यंत पोहोचली होती. त्यात बँकेने जिल्हा न्यायालयात कराबाबत दावाही दाखल केला होता. या दाव्याचा निकाल ४ फेब्रुवारी रोजी लागला. न्यायालयाने बँकेची याचिका फेटाळून लावली होती.
न्यायालयीन निकालानंतर महापालिकेने बँकेला थकबाकीपोटी जप्तीची नोटीसही बजाविली. तरीही बँकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे, वाॅरंट अधिकारी काका हलवाई यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथक बँकेत धडकले. थकबाकी न भरल्यास बँकेला सील ठोकण्याचा इशाराही दिला. तब्बल तासभर कारवाईबाबत वादविवाद सुरू होता. अखेर बँकेकडून थकबाकीची रक्कम भरण्याची तयारी दाखविण्यात आली.
महापालिकेने दंडाच्या रकमेत सवलत देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार बँकेला ९९ लाख २३ हजार ८८६ रुपयांची सवलत देण्यात आली. उर्वरित दोन कोटी ८ लाख २८ हजार ९५ रुपयाचा डीडी महापालिकेकडे सुपुर्द केला. त्यामुळे महापालिकेने जप्तीची कारवाई मागे घेतली.
या कारवाईत कर अधिक्षक वाहिद मुल्ला, मोहिद्दीन पटेल, महेश भंडारे, शिवाजी शिंदे, गणी सय्यद, महेश साळुंखे, कुमार गेजगे, राजू जमादार, अनिकेत क्षीरसागर यांनी भाग घेतला.
तीन पाणी कनेक्शन तोडली
घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीसह पाणी कनेक्शन तोडण्याची मोहिमही हाती घेतली आहे. सोमवारी थकबाकीपोटी तीन नळ कनेक्शन तोडण्यात आल्याचे कर निर्धारक नितीन शिंदे यांनी सांगितले.