सांगली महापालिकेचे स्वप्न होतं झकास, पण कारभाऱ्यांनीच केलं भकास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 05:51 PM2023-02-08T17:51:19+5:302023-02-08T17:51:43+5:30
गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही
सांगली : सांगली व्यापाराचे, मिरज वैद्यकीय, तर कुपवाड औद्योगिक विकासाचे केंद्र आहे. हे तीन शहरे एकत्र आले तर राज्यातील एक आदर्श महापालिका होईल, ही भावना होती. महापालिकेचे स्वप्न वाईट नव्हते, परंतु स्वप्न राबविणारे चांगले भेटले नाहीत. पंचवीस वर्षांत गोड काहीच सांगण्यासारखे नाही, कारभाऱ्यांनी शहराची वाट लावली, अशा शब्दात महापालिका स्थापनेत पुढाकार घेतलेले तत्कालीन ग्रामविकास तथा पालकमंत्री आण्णासाहेब डांगे यांनी हल्ला चढविला.
महापालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त डांगे यांनी कारभार आणि कारभाऱ्यावर घणाघात केला. ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले की, महापालिकेच्या स्थापनेपासून ना रस्ते सुधारले, ना शुद्ध पाणी देता आले. साधा शेरीनाला अडविता आला नाही. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला नोटीस बजाविली होती. मी शेरीनाल्यासाठी योजना आखली. काळीखण बंदिस्त करून सांडपाणी तिथे आणून त्यात गोडे पाणी मिसळून ते शेतीला द्यायचे, असा विचार होता. त्याचे काय केले?
गजानना, तुझी कृष्णा मैली!
गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेला साधा शेरीनाला अडविता आलेला नाही. युतीच्या काळात शेरीनाल्याचे पाणी काळ्या खणीत आणून त्यावर प्रक्रिया करण्याची योजना आखली होती. हे पाणी शहरालगतच्या गावांतील शेतींना देण्यात येणार होते; पण महापालिकेने तसा प्रकल्पच तयार केला नाही. प्रस्ताव दिला असता तर तेव्हाच शेरीनाल्याचा प्रश्न निकाली निघाला असता. आता शेरीनाल्याचे पाणी नदीपात्रात जात आहेत. ‘गजानना, तुझी कृष्णा मैली’च राहिली आहे, अशी टीकाही डांगे यांनी केली.
तीनही शहरे मनाने जुळलीच नाहीत
तीनही शहरे मनाने एक झाली नाहीत. नागरी ऐक्य घडविण्यात अपयश आले आहे. सांगली, मिरज आपले मानून दिशा देणारे कोणीच नाही. परिणामी शहरातील लोकांना हायफाय जीवन जगण्याची संधी हिरावली गेली.
पाण्यावर केवळ चर्चाच
आजपर्यंतचा कारभार आंबट, गोड आहे. गोड काहीच सांगण्यासारखे आहे. पिण्याच्या पाण्यावर केवळ चर्चाच होते. स्वत:चे प्रशस्त कार्यालयही उभारता आलेले नाही. अंतर्गत रस्त्यांचा विस्तार केला नाही. शंभर फुटी रस्त्याची काय अवस्था आहे. आज तो मुख्य रस्ता व्हायला हवा होता.
कोल्हापूर शहराचा विकास झालाच ना!
कोल्हापूरचा विकास झाला, पण सांगली महापालिकेचा झाला नाही. कोणत्याही महापालिकेशी तुलना केली तरी सांगली मागेच राहिली आहे, अशी टीकाही केली.
संभाजी पवार, मदनभाऊ, प्रकाशबापूंनी काय केले?
डांगे म्हणाले, दिवंगत संभाजी पवार, मदनभाऊ पाटील, प्रकाशबापू पाटील यांनी काय केले? वसंतदादा पाटील यांची पुण्याई वापरून त्यांच्याकडून या तिन्ही शहराचा विकास अपेक्षित होता. शासकीय योजना खेचून आणून त्या प्रशासनावर थोपविण्याची गरज होती. महापालिका क्षेत्राच्या अशा सर्वांगीण विकासाचे हे स्वप्न अपुरेच राहिले आहे.