विकसित भारत अभियानात सांगली महापालिका राज्यात आघाडीवर
By अविनाश कोळी | Published: January 24, 2024 04:58 PM2024-01-24T16:58:27+5:302024-01-24T16:58:49+5:30
लोकसहभागासह अनेक विभागात पहिल्या क्रमांकावर विराजमान
सांगली : विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने महाराष्ट्रातील ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. दुसऱ्या स्थानी पनवेल तर तिसऱ्या स्थानी कोल्हापूर महापालिका आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा हा एक शासकीय उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी आदी प्रमुख केंद्र शासनाच्या योजनांबद्दल नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. योजनेपासून वंचित घटकांपर्यंत पाेहोचण्याचाही उद्देश यात आहे.
योजनेंतर्गत राज्यभरातील महापालिकांना यात्रेचा कार्यक्रम ठरवून दिला होता. यात ड वर्गातील १९ पैकी १६ महापालिकांनी यात्रा पूर्ण केली. यात भिवंडी, जळगाव व चंद्रपूर अशा तीन महापालिकांचा कार्यक्रम दोन दिवसांत संपणार आहे.
अंतिम यादीतही सांगलीची आघाडी शक्य
संकल्प यात्रा अपूर्ण असलेल्या महापालिकांची आकडेवारी पाहिली तर अंतिम यादीतही सांगली महापालिकाच अव्वल राहण्याची शक्यता आहे. तीन वेगवेगळ्या गटात सांगली अव्वल आहे. पनवेल दोन गटात तर अन्य महापालिकांना एकाच गटात वर्चस्व राखता आले आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेला सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या परिश्रमातून हे यश मिळाले आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची कर्तव्य भावना यापुढेही जपली जाईल. - सुनील पवार, आयुक्त, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका