सांगली महापालिकेकडून २०० व्यापाऱ्यांना घरपट्टी वाढीच्या नोटीस, व्यापारी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:17 IST2025-02-20T17:16:45+5:302025-02-20T17:17:41+5:30
पाणी कनेक्शन बंद तरीही पाणीपट्टी

सांगली महापालिकेकडून २०० व्यापाऱ्यांना घरपट्टी वाढीच्या नोटीस, व्यापारी संतप्त
सांगली : येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील जवळपास २०० व्यापाऱ्यांना घरपट्टी वाढीच्या नोटीस महापालिका प्रशासनाने बजावल्या आहेत. महापालिका 'ड' दर्जाची असून 'अ' दर्जाची घरपट्टी वाढवल्याचा दावा व्यापा-यांनी केला आहे. सद्या १७ हजार रुपये घरपट्टी येणाऱ्या व्यापाऱ्यांना साडेचार लाखापर्यंत घरपट्टी वाढविली आहे. घरपट्टीत अव्वाच्या सव्वा वाढ झाल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी महापालिकेला तुमची घरपट्टी वाढ आम्हाला मान्य नसल्याचा लेखी खुलासा व्यापाऱ्यांनी केला आहे.
सांगली मार्केट यार्डात राज्यभरातून शेतीमाल विक्रीसाठी येत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून दरवर्षी घरपट्टीची ७० ते ८० लाख रुपये महापालिकेकडे भरले जात आहेत. पण, महापालिका प्रशासनाकडून रस्ते, गटारी, पाणी आणि विजेची काहीच सुविधा मिळत नाहीत. रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. लाखो रुपये खर्च करून दीड वर्षापूर्वी मुख्य चौकात स्ट्रीट लाईट बसविली आहे. पण, एकच महिना ती चालू होती. आजअखेर स्ट्रीटलाईट बंदच आहे.
अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून पुन्हा वाढीव घरपट्टीच्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. घरपट्टी वाढ ४० ते ५० पटीने वाढ केल्याचा दावा करीत महापालिका प्रशासनाच्या या धोरणाविषयी व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली.
पाणी कनेक्शन बंद तरीही पाणीपट्टी
सांगली मार्केट यार्डातील दैनंदिन व्यवहार सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतात. परंतु, या भागात पाणीपुरवठा विभागामार्फत सकाळी सात ते आठ या वेळेत पाणीपुरवठा होतो. याबाबत महापालिकेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. मार्केट यार्डातील पाण्याचे कनेक्शन बंद करूनही अद्याप पाण्याची बिले दिली जातात. ही बाब अयोग्य असून याची आकारणी करण्यात येऊ नये. तसेच बंद झालेले पाणी कनेक्शन रद्द करावीत, अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे.
साफसफाई बंद, घंटागाडी फिरकतच नाही
सांगली मार्केट यार्डातील रस्ते खड्डेमय झाले असून, अपुरी लाईट व्यवस्थेमुळे शेतीमालाच्या चोऱ्यात वाढ झाली आहे. संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था खराब झाली असून, पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून राहते. साफसफाई कधीही केली जात नसून घंटागाडीची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापाऱ्यांना कर आकारणी संदर्भात नोटीस आल्या आहेत. आमचे सभासदांना आलेल्या नोटीस मान्य व कबूल नाहीत. सांगली मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी शासनाचे मान्यतेवरून शेड बांधलेले आहेत. त्या जागेत कोणताही खरेदी-विक्री व्यवहार होत नाही. परंतु, यास व्यावसायिक दराने घरपट्टी आकारणी करणे अयोग्य आहे. वाढीव घरपट्टी आम्ही भरणार नाही. - अमरसिंह देसाई, अध्यक्ष, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स.