सांगली महापालिका घोटाळ्यातील रकमेची वसुली होणार; तत्कालीन नगरसेवक, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 01:36 PM2022-06-22T13:36:05+5:302022-06-22T13:36:23+5:30
महापालिकेच्या सन २००५ ते २०१० काळातील विशेष लेखा परीक्षणात विविध कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
सांगली : महापालिकेच्या सन २००५ ते २०१० काळातील विशेष लेखा परीक्षणात विविध कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या गैरव्यवहार प्रकरणात संबंधित पदाधिकारी, नगरसेवक व तत्कालीन अधिकाऱ्यांवर वसुलीची कारवाई करण्याची शिफारस लेखा परीक्षकांनी केली होती. त्याची अमंलबजावणी प्रशासनाने सुरू केली असून तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांवर रक्कम वसुलीच्या कारवाईसाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
महापालिकेत गैर कारभाराविषयी शासनाकडे तक्ररी करण्यात आल्यानंतर पालिकेचे २००५ ते २०१० या कालावधीचे विशेष शासकीय लेखा परीक्षण करण्यात आले. या लेखा परीक्षणात पालिकेतील विविध कामात गैरव्यवहार झाल्याचे, तसेच अनियमितता, बेकायदेशीर कामे झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लेखा परीक्षकांनी याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितांकडून या रकमा वसूल करणे आवश्यक असल्याची शिफारस शासनाकडे केली होती. गेली काही वर्षे हा अहवाल शासन दरबारी पडून होता. याप्रकरणी कारवाई होत नसल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
न्यायालयाने तातडीने सदर घोटाळ्याची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्याचे आदेश शासनास दिले. शासनाने याप्रकरणी प्रशासन जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. पण, पालिका प्रशासनानेही काहीही कारवाई केली आहे. त्यामुळे न्यायालयात पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी काही दिवसांपूर्वी तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शासनाकडे अहवाल पाठवला आहे. त्यामुळे या कोट्यवधींच्या घोटाळ्याची वसुली लागण्याची शक्यता आहे.