स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात सांगली महापालिका 'टॉप टेन'मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:34 PM2020-08-20T17:34:52+5:302020-08-20T17:36:31+5:30
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे.
सांगली : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सांगली महापालिकेने देशात ३६ वा तर राज्यात ९ वा क्रमांक पटकाविला आहे. गतवर्षी देशात १०६ व्या क्रमांकावर असलेल्या महापालिकेने यंदाच्या सर्वेक्षणात हनुमान उडी घेतली आहे.
आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे पहिल्यांदाच महापालिका राज्यात 'टॉपटेन'मध्ये पोहोचली आहे. २०१८ साली महापालिका देशात ११९ व्या तर २०१९ मध्ये १०६ व्या क्रमांकावर होती. गतवर्षी शहराला महापुराचा मोठा फटका बसला होता.
महापूरातून सावरण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे तयारी सुरू केली. आयुक्त कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग सक्रिय झाला. उपायुक्त स्मृती पाटील यांच्यावर अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली.
आरोग्याधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, डॉ. रविंद्र ताटे व त्यांची टीम सोबतीला होती. महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांची रंगरूपच पालटून टाकले. सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, दुरुस्ती करण्यात आली.
मैला साफ करणे आणि वाहतूक, सार्वजनिक सौंदर्यीकरण, विद्यार्थी आणि नागरिक सहभाग, स्वच्छता अॅप, सार्वजनिक स्वच्छता, कचरा घंटागाड्या, कचरा कोंडाळी, पाणी व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, घातक कचरा, कचऱ्याचे इतर प्रकार आणि त्यावरील प्रक्रिया, सार्वजनिक पाणवठ्यांची स्वच्छता इत्यादी क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली. या अभियानात प्रशासन एकाकी कष्ट घेत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून पहिल्यांदाच देशात 36 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
कंटेनरमुक्त शहराचे उद्दिष्ट : पाटील
यंदा कंटेमरमुक्त व शंभर टक्के शौचालय़ुक्त शहर करण्याचा संकल्प होता. त्यादृष्टीने नियोजनही केले होते. पण कोरोनामुळे या कामांना ब्रेक लागला आहे. तरीही आम्ही कचरामुक्त शहर, रस्त्यांची स्वच्छता, प्लास्टिक व दैनदिंन कचर्यावर प्रक्रिया करुन शहराचे सौंदर्य वाढविण्यावर भर राहिल अशी प्रतिक्रिया उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली.