सांगली महापालिका उभारणार १०० खाटांचे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:15 PM2020-08-08T17:15:24+5:302020-08-08T17:17:47+5:30
खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली : खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयासाठी प्रशासनाने जागेचा शोध सुरू केला आहे.
जागेसंदर्भात रविवारी पदाधिकारी व नगरसेवकांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. यातच खाजगी रुग्णालयाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारापोटी लाख ते दीड लाख रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची त्याच्या नातेवाईकाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगरसेवक अभिजीत भोसले, नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी खासगी रुग्णालयाच्या लुटीविरोधात आवाज उठवला आहे. त्यातच महापालिका क्षेत्रातील रुग्णांसाठी खाटाही कमी पडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
नुकत्याच महापालिकेत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयुक्त नितीन कापडणीस यांनीही तातडीने 100 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या कोविड रुग्णालयात ॲाक्सिजन बेडची व्यवस्था असणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रात जागेचा शोध सुरू करण्यात आला. असून १०० खाटा आणि अन्य सामग्री बसणारी जागा किंवा मंगल कार्यालयाचा हॉल निवडला जाणार आहे.
याबाबत रविवारी पदाधिकारी, नगरसेवकांसोबत बैठक घेऊन या १०० खाटांच्या रुग्णालयाचे नियोजन केले जाणार आहे. महापालिकेकडून जागेची निश्चिती होता तात्काळ रुग्णालय उभारण्यास सुरूवात होईल, असे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रुग्णांवरही मनपाकडून खर्च कोरोनाच्या महामारीत महापालिकेने केवळ शहरातील रुग्णांची नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचीही काळजी घेतली आहे.
महापालिकेने उभारलेल्या कोवीड केअर सेंटर, इंस्टिट्यूट क्वारंटाईन कक्षात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णही दाखल झाले आहेत. या रुग्णांना जेवण, नाष्टा ते औषधापर्यंतचा खर्च महापालिकेने केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना सर्व त्या सुविधा महापालिकेने पुरविल्या आहेत.