सांगली महापालिकेचा लाचखोर प्रभारी मुकादम निलंबित
By शीतल पाटील | Published: November 30, 2023 09:40 PM2023-11-30T21:40:24+5:302023-11-30T21:40:32+5:30
आयुक्त सुनील पवार यांची कारवाई
सांगली: चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात १२ हजारांच्या लाचेची मागणी करत त्यातील आठ हजार रुपये स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादम किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८, रा. मदिना मशिदीजवळ सुभाषनगर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी जबडे याला महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी निलंबित केले.
तक्रारदार हा मानधनावर महापालिकेकडे सेवेत आहे तर संशयित किशोर जबडे हा आरोग्य विभागात प्रभाग २० साठी प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे तीन हजार असे १२ हजारांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीअंती आठ हजारांची लाचेची मागणी केल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासात निष्पन्न झाले होते.
त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या एका चहा टपरीजवळ सापळा लावला असता, तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्विकारताना जबडे याला रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबडे याला निलंबित करण्यात आले. महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली.