सांगली महापालिकेतील भाजप पर्वास जल्लोषात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:26 PM2018-08-27T23:26:04+5:302018-08-27T23:26:08+5:30

Sangli municipal election begins in BJP | सांगली महापालिकेतील भाजप पर्वास जल्लोषात प्रारंभ

सांगली महापालिकेतील भाजप पर्वास जल्लोषात प्रारंभ

Next

सांगली : पावसाच्या कोसळणाऱ्या सरी, फटाक्यांची आतषबाजी, तसेच नाशिक व धनगरी ढोलांच्या निनादात सोमवारी महापालिकेतील भाजप पर्वाला सुरूवात झाली. महापौर, उपमहापौर व गटनेत्यांनी मिरवणुकीने जाऊन महापालिकेच्या कारभाराची सूत्रे घेतली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नूतन पदाधिकाºयांसाठी मुख्यालयात रांगोळी काढून, फुलांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव करीत सत्ता मिळवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष भाजपने साजरा केला नव्हता. महापौर, उपमहापौर निवडीही अत्यंत साधेपणाने पार पाडल्या होता. ही सारी कसर भाजपने सोमवारी विजयाच्या मिरवणुकीने भरून काढली. स्टेशन चौक ते महापालिकेपर्यंत जल्लोष करीत भाजपचे नेते, कार्यकर्ते आले.
महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी व सभागृह नेते युवराज बावडेकर यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भगवानराव साळुंखे, दीपकबाबा शिंदे, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, सुरेश आवटी, प्रकाश बिरजे सहभागी झाले होते.
मिरजेचे मुला-मुलींचे आकर्षक ढोलपथक, तसेच बिरदेव ग्रुपच्या धनगरी ढोलपथकाच्या निनादात मिरवणुकीला सुरूवात झाली. अधुनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यातच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. महापालिकेत मिरवणूक आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आ. गाडगीळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महापौर, उपमहापौर व गटनेत्यांच्या पदग्रहणाचा समारंभ झाला.
पाटील गैरहजर : बापट यांची हजेरी
भाजपच्या पदग्रहण समारंभाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार होते. पण व्यस्त कार्यक्रमांमुळे ते येऊ शकले नाहीत. पण भाजपचे दुसरे मंत्री गिरीश बापट मात्र आवर्जून उपस्थित होते. बापट हे एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. त्यांनी महापालिकेत येऊन महापौर, उपमहापौर व गटनेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी नगरसेविका स्वरदा केळकर उपस्थित होत्या.
महापालिका भगवेमय
या मिरवणुकीत भाजपचे पदाधिकारी, नेतेमंडळी भगवा शर्ट, भगवे फेटे घालून, तर महिला सदस्या भगव्या साड्या, भगवे फेटे घालून सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे महापालिकेतील वातावरण भगवेमय झाले होते.

Web Title: Sangli municipal election begins in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.