सांगली महापालिका निवडणूक; टक्का घसरला; चिंता प्रशासन अन् पक्षांना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:15 PM2018-08-02T23:15:40+5:302018-08-02T23:15:45+5:30
सांगली : महापालिकेसाठी बुधवारी ६२.१७ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा यंदा एक ते सव्वा टक्का मतदान घटले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या उपक्रमांतून मतदान वाढीसाठी प्रयत्न केले, पण ते प्रत्यक्षात मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. मोठे प्रभाग असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रभागातील प्रचार रंगला नाही. त्यातून मतदारांत निरुत्साह होता. या साऱ्याचा परिपाक मतांचा टक्का घसरण्यात झाला असावा, असे मत विविध क्षेत्रातील मंडळी व्यक्त करू लागली आहेत.
महापालिकेच्या २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २ लाख ४८ हजार ११२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या निवडणुकीत मतांची टक्केवारी ६३.४२ इतकी होती. काँग्रेस, राष्ट्रवादी व काही प्रभागात स्वाभिमानी विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली. त्या लढतीत काँग्रेसने बाजी मारली. त्यावेळी प्रशासनाने मतदार जागृतीसाठी फारसे प्रयत्न केले नव्हते. तरीही यंदाच्या तुलनेत जादा मतदान झाले होते.
यंदा मात्र प्रशासनाने निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान जागृतीची मोहीम हाती घेतली होती. शहरातील प्रत्येक चौकात भलेमोठे डिजिटल फलक लागले होते. मतदार जागृतीसाठी वाजत-गाजत आणि पावसात भिजत वरिष्ठ अधिकाºयांनी रॅली काढली होती. प्रसारमाध्यमातून वारंवार आवाहनही केले जात होते. पथनाट्यातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. तरीही मतदार घराबाहेर पडू शकला नाही, हे अपयश प्रशासनाचे म्हणावे लागेल. प्रचारात भपका होता, पण प्रत्यक्षात मतदारांपर्यंत प्रशासन पोहोचू शकले नाही, असेच सध्याच्या टक्केवारीवरून दिसून येते. दुसरीकडे यंदा चारसदस्यीय पद्धतीमुळे प्रभागाची रचना भलीमोठी होती. प्रचारात ईर्षा कुठेच दिसत नव्हती. मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. अगदी बहुरंगी लढती रंगल्या, पण मतदाराला घराबाहेर काढून मतदान करवून घेण्यात राजकीय पक्षही कमी पडले. प्रभागाचा विस्तार वाढल्याने तेरा दिवसात घररोघरी पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलवले नाही. त्याचा परिणाम टक्केवारीवर झाल्याचे सांगण्यात येते.
सुशिक्षित भागात मतदान कमी
मतदानाची आकडेवारी पाहता, उच्चभ्रू-सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाºया प्रभागात मतांची टक्केवारी कमी असल्याचे जाणवते. ‘हार्ट आॅफ दि सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाºया विश्रामबाग परिसरातील प्रभाग १७ व प्रभाग १९ या दोन्हीमध्ये अनुक्रमे ५४ व ५६ टक्के मतदान झाले आहे.