सांगली महापालिका निवडणूक : ७८ जागांसाठी ४५० उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:11 PM2018-07-17T16:11:58+5:302018-07-17T16:16:29+5:30
सांगली महापालिकेसाठी अर्ज माघारीसाठी शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत.
सांगली : महापालिकेसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्षांसह तब्बल ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. अनेक प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहे.
सांगली महापालिकेसाठी १ आॅगस्टसाठी मतदान होणार असून निवडणूकीसाठी मुदतीमध्ये ११२८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत सुमारे १५३ अर्ज अवैध ठरले होते. मंगळवारी दुपारी तीनपर्यँत अंतीम मुदत होती.
या मुदतीत ३५० उमेदवारांनी माघार घेतल्याने ७८ जागांसाठी ४५० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांना बंडखोरीची लागण झाली असून बंडखोरी थोपवण्यात नेत्यांना अपयश आल्याचे स्प्ष्ट झाले असून यामुळे अनेक प्रभागात चौरंगी आणि बहुरंगी लढती होणार आहेत.
अनेक प्रभागात बंडखोरी
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापयत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारावर दबाब आणला, मात्र अनेक प्रभागात बंडखोर थंड झाले नसल्याचे स्प्ष्ट झाले आहे.
काँग्रेसला प्रभागात ९ मधून मदनभाऊ गटाचे निष्टावंत अतुल माने, भूपाल उफर् बंडू सलगर, राष्ट्रवादीच्या वृषाली पाटील, जन्नत मिरजे(कुरणे) प्रभाग १० मधून भाजपचे नरेंद्र् तोषणीवाल, काँग्रेसच्या प्रियंका मिराजदार, राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका माधुरी कलगुटगी, काँग्रेसचे अशोक मासाळे यांनी बंडखोरी केली आहे.
प्रभाग ११ मधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विलास सजे, काँग्रेसचे आनंदा लेंगरे, अशोक म्हरूगडे, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शीतल पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष गोयकर आदींनी बंडखोरीचे निशाण कायम ठेवले आहे.
प्रभाग १६ मधून काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजेश नाईक, असिफ बावा, उमर गवंडी, प्रभाग १९ मधून काँग्रेसचे अलका एेवळे, अनिता आलदर, अजय देशमुख, महेश कणे यांनी स्वतंत्र पॅनेल केले आहे.