सांगली महापालिका निवडणूक : माधवनगरमध्ये साडेआठ लाखाची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:20 PM2018-07-12T13:20:58+5:302018-07-12T13:25:59+5:30
माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची चौकशी करण्यात येत आहे.
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे नाकाबंदीवेळी एका मोटारीतून साडेआठ लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे. मोटारीचे मालक सुरेश शांतीनाथ कोठावळे (वय ५५, रा. पेठभाग) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी ही रोकड शहरात आणली जात होती का? याची चौकशी करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी दररोज सायंकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील प्रमुख मार्गावर पोलिसांनी चेकपोस्ट नाके सुरु केली आहेत. यासाठी तंबूही मारला आहे.
माधवनगर जकात नाक्यावरही तंबू ठोकण्यात आली आहे. याठिकाणी संजयनगरचे पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे, एस. पी. इंगवले, एन. एस. सुतार, एम. एम. कांबळे, हसन मुलाणी यांचे पथकाने बुधवारी सायंकाळी नाकाबंदी लावली होती.
सांगलीहून पावणेसहा वाजता मोटार (क्र. एमएच १० ए ५१५१) भरधाव वेगाने आली. पथकाने मोटार थांबविली. मोटारीचे चालक व मालक सुरेश कोठावळे यांच्याकडे मोटारीची कागदपत्रे व तसेच वाहन चालविण्याचा परवान्याची मागणी केली. कोठावळे यांनी सर्व कागदपत्रे दाखविली. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मोटारीची झडती घेतली. डिक्कीमध्ये एक बॅग सापडली. या बॅगेत आठ लाख ५१ हजाराची रोकड होती. यामध्ये पाचशे व दोन हजाराच्या नोटा होत्या.
दोन शासकीय पंच बोलावून घटनास्थळीच पंचनामा करुन ही रोकड जप्त करण्यात आली. कोठावळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आयकर विभागाला या कारवाईची माहिती देण्यात आली. गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने संजयनगर पोलीस ठाण्यात जाऊन ही रोकड ताब्यात घेतली.
रोकड व्यापाऱ्याची
कोठावळे यांचे वाळव्यात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी ही रोकड मार्केट यार्डमधील एक व्यापाऱ्याकडून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यासंदर्भात ठोस कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे पोलिसांनी सांगितले. कोठावळे यांनी ही रोकड कोठून व कशासाठी आणली होती? ते सांगलीत घेऊन का फिरत होते? याची पुढील चौकशी आयकरचे अधिकारी करणार आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.