सांगली महापालिका वीज बिल घोटाळा प्रकरण: एसआयटी नियुक्तीबाबत लोकायुक्तांकडून गृहखात्यावर ताशेरे
By शीतल पाटील | Published: October 12, 2023 04:17 PM2023-10-12T16:17:44+5:302023-10-12T16:18:14+5:30
दिरंगाईच्या चौकशीचे आदेश
सांगली : महापालिकेच्या वीजबिलातील पाच कोटी ९२ लाख रुपयांच्या घोटाळ्याची लोकायुक्तांनी गंभीर दखल घेत एप्रिल महिन्यात तीन सदस्यीय एसआयटी नियुक्तीचे आदेश दिले होते. पण आजअखेर एसआयटी स्थापन होऊ शकली नाही. गुरुवारी सुनावणीवेळी लोकायुक्तांनी गृहखात्याच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. एसआयटी नियुक्तीच्या दिरंगाईबाबत चौकशीचे आदेशही पोलिस महासंचालकांना देण्यात आले.
दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या वीजबिलातील घोटाळा उघडकीस आला होता. पाच वर्षांतील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महापालिकेने महावितरण कंपनीला वीजबिलापोटी दिलेल्या धनादेशावर खासगी ग्राहकांची बिले भरण्यात आली. त्यानंतरही महापालिकेला थकबाकीची बिले आली. तत्कालीन आयुक्तांनी ११ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. महापालिकेने महावितरणविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पण त्यानंतरही महापालिकेचे सहा कोटी वसूल झाले नव्हते. शिवाय दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईला टाळाटाळ सुरू होती.
नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी वीजबिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर एप्रिल महिन्यात सुनावणी होऊन लोकायुक्तांनी तीन सदस्यांची एसआयटी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या समितीत महापालिका अधिकारी, शासकीय लेखापरीक्षक व पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आठ आठवड्यांत चौकशी करून लोकायुक्तांकडे अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
पण ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी एसआयटी स्थापन झालेली नाही. गुरुवारी सुनावणीवेळी लोकायुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलिस महासंचालक व गृहखात्याच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. एसआयटी नियुक्तीस दिरंगाईची चौकशी करण्याचे आदेशही लोकायुक्तांनी दिले. तसेच आदेशाचे पालन पोलिस महासंचालक व गृहखाते करीत नसेल तर ही बाब गंभीर आहे. भ्रष्टाचाराबाबत चालढकलपणा जनतेच्या हिताच्या नाही, अशा शब्दात ताशेरेही ओढले.
या सुनावणीला आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहूल रोकडे, नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
माळबंगला, शेतकरी बँकही रडारवर
माळबंगला येथील जागा खरेदीतील गैरकारभार व वसंतदादा बँकेत अडकलेल्या ठेवीवर साखळकर, रुईकर यांनी म्हणणे मांडले. या दोन्ही प्रकरणात महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब त्यांनी लोकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.