सांगली महापालिका :भर पावसात अर्ज भरण्यास उत्साह, महापौर शिकलगार यांना उमेदवारी, नाईक यांचा पत्ता कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 03:51 PM2018-07-11T15:51:41+5:302018-07-11T16:27:46+5:30
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ४१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे.
सांगली : सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज, बुधवारपासून प्रारंभ झाला. भर पावसातही इच्छूकांनी मोठा उत्साह दाखविला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहाही कार्यालयात प्रचंड गर्दी झाली असून काँग्रेसकडून ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपच्या अनेक इच्छूकांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांना तिकिट न मिळाल्याने नाराजी नाट्य रंगले आहे. विविध पक्षातील निष्ठावंताना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म निवडणुक कार्यालयात दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेसकडून ३८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ जागांची आघाडी झाली आहे. मिरजेतील प्रभाग क्रमांक ५ आणि सांगलीतील प्रभाग क्रमांक १३ सांगलीवाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७ जागेवर मैत्रीपुर्ण लढत होणार आहे. ४ जागा अनिल कुलकर्णीसाठी सोडल्या आहेत.
महापौर हारुण शिकलगार यांना उमेदवारी देण्यात आली असून राजेश नाईक यांचा पत्ता कापल्याची चर्चा सुरु आहे. सावंत गट भाजपमध्ये दाखल झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छूकांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. नायकवडी - जामदार तसेच हरिदास पाटील- दिलीप पाटील यांनी विरोधात अर्ज दाखल केल्याने त्यांची आमनेसामने लढत होईल अशी अपेक्षा आहे.
कॉंग्रेस आणि भाजपची एकाच हॉटेलवर खलबते. सुरु असून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जयश्री पाटील, आणि विशाल पाटील चौथ्या मजल्यावर तर भाजपचे खा. संजयकाका पाटील, दिनकर पाटील पाचव्या मजल्यावर उमेदवार व नाराजांशी चर्चा करीत आहेत.|
महापालिकेच्यावतीने आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी तीन शहरांत सहा कार्यालये सज्ज ठेवली आहेत, तर पक्षीय पातळीवर उमेदवारांचे अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. ११ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
सांगली महापालिका निवडणुकीसाठी एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येत्या १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू झाली आहे. ११ जुलैस दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्यांदाच या निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरले जात आहेत.
या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आप या चार प्रमुख पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही झाला आहे. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनाची संधी साधली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी आघाडी केली आहे, तर शिवसेना व भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. सुधार समिती व आप यांची युती पहिल्यांदाच नशीब अजमावत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांकडे जवळपास ११०० हून अधिक इच्छुक आहेत.
महापालिका प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी सहा विभागीय निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयात एक निवडणूक निर्णय अधिकारी व त्याच्या अखत्यारीखाली एक सहायक अधिकारी व दहा ते बारा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सांगलीत प्रभाग समिती एक (मुख्यालय), प्रभाग समिती दोन (शाळा क्रमांक एकजवळ), आरसीएच कार्यालय (काळ्या खणीजवळ) अशी तीन कार्यालये स्थापन केली आहेत. कुपवाडला एकच कार्यालय असून ते प्रभाग समिती तीनमध्ये आहे, तर मिरजेला दोन कार्यालये आहेत. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.