Sangli Election सांगली महापालिका प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:02 AM2018-07-30T00:02:15+5:302018-08-02T19:13:45+5:30
सांगली : महापालिका निवडणुकीनिमित्त गेल्या महिन्यापासून शहरात धडधडत असलेल्या राजकीय तोफा आज, सोमवारी सायंकाळी पाच वाजता थंड होतील. रिक्षा आणि वाहनांवरील ध्वनिवर्धकावरून ध्वनिफितींद्वारे प्रचार, पदयात्रांचा धडाका, जाहीर आणि कोपरा सभा, व्यक्तिगत गाठीभेटी, जेवणावळी, हळदी-कुंकू सोहळ्यांमुळे सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांत निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. हा सर्व गदारोळही आज सायंकाळनंतर शांत होईल.
महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक १ आॅगस्ट रोजी होत आहे. एकूण २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा १८ प्रभागांतून प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांतून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर शहरात इच्छुकांकडून तयारी सुरू होती; पण प्रत्यक्ष प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाले आणि निवडणुकीचे वातावरण तापू लागले. गेल्या महिन्यापासून तर शहरवासीय प्रत्यक्ष प्रचाराचा धडाका अनुभवत आहेत. भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादीतील आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज मंत्री व नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला. प्रचार सभेत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा व्यक्तिगत व पक्षीय आरोप-प्रत्यारोपांनी मतदारांची करमणूक झाली. काँग्रेस व राष्टÑवादीने भाजप व शिवसेनेला या निवडणुकीत लक्ष्य केले, तर भाजपच्या नेत्यांनी दोन्ही काँग्रेसवर टीका केली. भाजप व शिवसेना या मित्रपक्षांतील नेत्यांमध्येही जुगलबंदी पाहायला मिळाली.
प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ बाराच दिवस मिळाले. त्यानंतर शहरातील गल्लोगल्ली प्रचाराची राळ उडाली. बुधवारी सर्व उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम यंत्रांमध्ये बंद होईल. मोठे प्रभाग असल्यामुळे थेट पक्षांना मतदान होणार की ‘क्रॉस व्होटिंग’ होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.
नेत्यांच्या सभांनी फड गाजला
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. सतेज पाटील, आ. विश्वजित कदम, नसीम खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. हसन मुश्रीफ, प्रकाश शेंडगे, भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे, विजय देशमुख, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. सुरेश हळवणकर, शिवसेनेकडून मंत्री रामदास कदम, एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, खा. गजानन कीर्तीकर, आ. राजेश क्षीरसागर, नितीन बानुगडे-पाटील, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, अपक्ष महाआघाडीकडून खा. राजू शेट्टी यांच्या सभा आणि बैठकांनी वातावरण ढवळून निघाले.
पदयात्रांनी वातावरण दणाणले
रविवारी सर्वच प्रभागांत पदयात्रा निघाल्याने सर्वत्र गर्दीचे चित्र होते. प्रचारगीतांच्या ध्वनिफिती वाजवणारी वाहने, वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि उमेदवारांच्या नावाने होणारी घोषणाबाजी यामुळे शहर दणाणून गेले. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पदयात्रांचे नियोजन केले जात आहे.