सांगली महापालिकेच्या नव्या महापौरांची निवड १८ ला; हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:48 PM2018-08-07T23:48:25+5:302018-08-07T23:48:32+5:30

 Sangli municipality's new Mayor will be elected on 18th. Movements fast | सांगली महापालिकेच्या नव्या महापौरांची निवड १८ ला; हालचाली गतिमान

सांगली महापालिकेच्या नव्या महापौरांची निवड १८ ला; हालचाली गतिमान

googlenewsNext

सांगली : महापालिकेच्या नव्या महापौर, उपमहापौरांची निवड शनिवारी (दि. १८) होणार आहे. निवडीचा प्रस्ताव नगरसचिव विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नूतन सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या असून, कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. नूतन सभागृहात भाजपचे ४१, काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १५, तर स्वाभिमानी आघाडीचा एक व अपक्ष एक, असे सदस्य आहेत. दोन्ही काँग्रेसने निवडणुकीसाठी आघाडी केली होती. पण त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल १३ आॅगस्टला संपणार आहे. त्यानंतर महापालिकेची सूत्रे नवे सत्ताधारी असलेल्या भाजपकडे जातील.
दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव विभागाने १८ आॅगस्ट रोजी महापौर निवड करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. या निवड कार्यक्रमाला तात्काळ मान्यता मिळावी, यासाठी नगरसचिव के. सी. हळिंगळे स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला बुधवारी विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळेल व अर्ज भरण्याचा कार्यक्रमही जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. निवडीआधी तीन दिवस महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करावे लागतील. त्यात १५ आॅगस्ट सुटीचा दिवस असल्याने १४ आॅगस्ट रोजीच अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल, असे सूत्रांनी सांगितले.
नूतन महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी भाजपमधून सविता मदने, उर्मिला बेलवलकर, संगीता खोत, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, गीता सुतार यांची नावे चर्चेत आहेत, तर उपमहापौर पदासाठी प्रकाश ढंग, निरंजन आवटी, धीरज सूर्यवंशी यांच्या नावांची चर्चा आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, खा. संजयकाका पाटील व भाजपच्या कोअर कमिटीकडून घेतला जाणार आहे.

झेंडावंदनाचा मुहूर्त टळला
१५ आॅगस्ट रोजी नूतन महापौरांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांचा होता. त्यासाठी १४ आॅगस्ट रोजीच महापौर निवड घ्यावी, असा प्रयत्न दोन दिवसांपासून सुरू होता. त्यात नूतन सदस्यांचे गॅझेटचे काम सोमवारी पूर्ण झाले. मंगळवारी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळाली तरी, निवडणूक कार्यक्रमाला अपेक्षित कालावधी मिळणार नव्हता. ही बाब प्रशासनाने भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर भाजप नेत्यांनी १८ आॅगस्टच्या मुहूर्ताला मंजुरी दिली. परिणामी झेंडावंदनाचा मुहूर्त टळला.

काँग्रेसचीही बैठक
विरोधी पक्षनेते निवडीसाठी गुरुवारी काँग्रेस नेत्यांचीही बैठक होत आहे. या बैठकीस आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील नगरसेवकांतून मते आजमावणार आहेत. या पदासाठी उत्तम साखळकर, महापौर हारुण शिकलगार यांची नावे चर्चेत आहेत; तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदाचा फैसला जयंत पाटील घेणार आहेत.
८ नगरसेविका इच्छुक
महापौर, उपमहापौरपदासंदर्भात बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य, नूतन नगरसेवक उपस्थित राहणार आहे. महापौर निवड पहिले लक्ष्य असून, हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. आठ महिला इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार, यावर बैठकीत खल रंगणार आहे. महापौरपदाची संधी देताना अन्य शहरांचा समतोल साधत गटनेते, उपमहापौर, स्थायी समिती पदांच्या संधीवरही चर्चा होणार आहे.

Web Title:  Sangli municipality's new Mayor will be elected on 18th. Movements fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.