Sangli: खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा हादरला, कुणीकोणुरमध्ये मायलेकीची हत्या
By श्रीनिवास नागे | Published: April 24, 2023 11:13 AM2023-04-24T11:13:42+5:302023-04-24T11:54:11+5:30
खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली
दरीबडची/उमदी : खुनाच्या घटनेने जत तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. कुणीकोणुरमध्ये मायलेकीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती ही घटना घडली. संशयावरुन पतीनेच खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. चौकशीसाठी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, कुणीकोणूर-सनमडी रस्त्यालगत बेळंखी वस्तीवर बिराप्पा बेंळुखी कुटुंबासह राहतात. चौदा वर्षांपूर्वी त्याचे प्रियंका याच्याशी लग्न झाले होते. त्यांना तीन मुले आहेत. बिराप्पाला पत्नी प्रियंकाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते.
काल, रविवारी पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. भांडणाचा आवाज ऐकून मोठी मुलगी मोहिनी आली. बिराप्पा पत्नी प्रियंकाला खाली पाडून दोरीने गळा आवळताना मुलीने सोडविण्याचा प्रयत्न केला. तिला ढकलून जोराने गळा आवळल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगी खुनाची वाच्यता करेल या भितीने त्याने मोहिनीचाही गळा आवळून खून केला.
पत्नी गायब झाल्याचा बनाव
दुहेरी खून केल्यावर लपविण्यासाठी शांत डोक्याने पत्नी गायब झाल्याचा बनाव केला. नातेवाईक, ग्रामस्थांनी शोधाशोध केली. दोन्ही मायलेकीचा मृतदेह झोपडीत आढळून आले. ही घटना संशयास्पद असल्याने पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिस ठाण्याला माहिती दिली. तात्काळ उमदी पोलिसांनी घटनास्थळी दाखल पाहणी केली. अन् पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे घटनास्थळी भेट दिली.