सांगली : आष्ट्यात तरुणाचा खून हल्लेखोर पसार, जागेच्या वादातून घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:55 AM2018-09-28T11:55:54+5:302018-09-28T11:58:33+5:30
आष्टा (ता. वाळवा) येथील सचिन धनाजी हजारे (वय २५) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला.
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील सचिन धनाजी हजारे (वय २५) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. आष्टा-वडगाव रस्त्यावर मायाक्का मंदिरजवळ गुरुवारी सायंकाळी रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन हजारे हा शेती व मेंढीपालन करीत होता. त्यास धनगरी ओव्याचा छंद होता. आष्ट्यातीलच शिवाजी माने याच्याशी सचिनचा जागेवरून वाद होता. गुरुवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान वैभव हॉटेलचे चालक व सचिन याचा मामे भाऊ अशोक रामचंद्र सिद्ध (वय ५० ) यांना सचिनचा हॉटेल मागे ओरडल्याचा आवाज आला असता ते धावत घटनास्थळी आले. तिथे सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तुला कोणी मारले असे विचारले असता शिवाजी नायकू माने याने मारल्याचे सांगितले.
सचिन याच्या कमरेवर वार झाले होते. याचवेळी शिवाजी माने हा बिरोबा मंदिराकडे पळत गेला व सायकल घेवून नागाव रस्त्याने निघून गेला.
दरम्यान, सिद्ध यांनी इतर नातेवाईकांना बोलावून घेवून आष्टा पोलीस ठाण्यात माहिती दिली. सचिनला उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच सचिन मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सचिन याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरा सचिन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक सिद्ध यांनी शिवाजी माने याने सचिनचा खून केल्याची फिर्याद दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत माने यास अटक करण्यात आलेली नव्हती. त्याचा शोध सुरू आहे.