सांगली : आष्ट्यात २६ पासून राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा, जय्यत तयारी : डांगे विद्या संकुलात आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:55 AM2017-12-23T11:55:08+5:302017-12-23T12:01:12+5:30
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे विद्या संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे.
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे विद्या संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत भारतीय शालेय महासंघ यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद व संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षाखालील मुला-मुलींच्या ६३ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धा शनिवार, दि. २६ ते बुधवार, दि. ३० अखेर होत आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे व जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डांगे म्हणाले, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते उद्घाटन होत असून, माजी मंत्री आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी आहेत. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव उपस्थित राहणार आहेत.
विविध राज्यातील १२०० खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंच, मार्गदर्शक अधिकारी सहभागी होणार आहेत. डांगे संकुल येथील क्रीडांगणावर विद्युतझोतात सामने होत असून, चार क्रीडांगणे, प्रेक्षक गॅलरी, सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच व मार्गदर्शक यांची निवास व भोजन व्यवस्थाही केली आहे.