'गॅस दरवाढ' विरोधात सांगलीत राष्ट्रवादीचे 'चूल पेटवा' आंदोलन, भाजप सरकारचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:52 PM2022-03-24T12:52:29+5:302022-03-24T12:53:32+5:30
महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
संजयनगर : सांगलीतील भीमनगर परिसरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांसह झोपडपट्टीतील महिलांनी चुलीवर स्वयंपाक करुन मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
माजी नगरसेविका विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी सकाळी हे चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. कांबळे म्हणाल्या की, सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असून घरगुती गॅस सिलेंडर प्रचंड महागला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. महागाई वाढत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सामान्यांना सतावत आहे.
महागाईने आठ महिन्यात उच्चांक गाठला आहे. घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहचल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे मोदी सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने तातडीने गॅसचे दर कमी करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात मल्लवा कोठावळे, सुधा चिमलगी, मनिषा कांबळे, वंदना कांबळे, ज्योती इसरडे, रेणुका शिंगे, शशिकला गायकवाड, सखुबाई सूर्यवंशी, माणिक सरवदे, शालन कांबळे आदी उपस्थित होते.