सांगलीत राष्ट्रवादीचे ‘दे धक्का’ आंदोलन, इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:56 PM2018-09-03T12:56:11+5:302018-09-03T12:59:43+5:30
भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात सोमवारी सांगली शहर, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुचाकी ढकलत दे धक्का आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सांगली : भाजप सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात सोमवारी सांगली शहर, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुचाकी ढकलत दे धक्का आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
येथील स्टेशन चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. स्टेशन चौकातून राजवाडा चौकापर्यंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकी ढकलत नेल्या. मोदी सरकार हाय हाय.., मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तासभर चाललेल्या या आंदोलनात जोरदार निदर्शनेही करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात महटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यअच्छे दिनह्णची घोषणा करून जनतेला स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात चांगले दिवस लोकांना अनुभवाला आलेच नाहीत. सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीतून सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असताना तसेच अन्य देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले असताना देशात मोदी सरकारने हे भाव वाढवत नेण्याचे काम सुरू ठेवले आहे. सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर काही पैशांनी दर कमी करून पुन्हा वाढविण्याची नीती या सरकारने स्वीकारली आहे.
यासुद्धा गोष्टी आता लोकांच्या लक्षात आल्या आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने इंधन व गॅसचे दर कमी करावेत, ते पुन्हा वाढविण्याचा छुपा प्रयत्न करू नये. असा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाारा देण्यात आला आहे.
आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान, विनया पाठक, राहुल पवार, सागर घोडके, नगरसेवक विष्णु माने, योगेंद्र थोरात, दिग्विजय सूर्यवंशी, संगीता हारगे, अतहर नायकवडी, आयुब बारगीर, ज्योती अदाटे आदी सहभागी झाले होते.