सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे, डॉ. राजा दयानिधी यांची मुंबईला बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:39 IST2025-02-12T15:39:03+5:302025-02-12T15:39:17+5:30
सांगली : सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची मुंबई येथे सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. तसेच सांगलीचे नूतन ...

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे, डॉ. राजा दयानिधी यांची मुंबईला बदली
सांगली : सांगलीचेजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची मुंबई येथे सिडकोचे सहव्यवस्थापक म्हणून बदली झाली आहे. तसेच सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील ‘सारथी’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची नियुक्ती केली आहे.
डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्हाधिकारी म्हणून १९ जुलै २०२२ मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या. २०२४ मध्ये आलेल्या पूर आणि अतिवृष्टीच्या काळात त्यांनी चांगले काम केले. शासकीय दस्तावेज एकत्रित करण्याची राज्यातील सर्वाधिक चांगली कामगिरी सांगलीत झाली. स्वत: डॉक्टर असल्यामुळे सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात मूलभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.
नूतन जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांची नियुक्ती मंगळवारी झाली. ते पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेच्या (सारथी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी त्यांना ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. यापूर्वी सांगलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे.
आज पदभार स्वीकारणार
नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे हे बुधवारी सकाळी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून पदभार स्वीकारतील. काकडे यांना सांगली जिल्ह्याची माहिती असल्यामुळे विकास कामाला ते चांगली गती देऊ शकतात, अशी अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.