सांगली : अंधांना तंत्रज्ञानामुळे मिळतेय नवी दृष्टी, संशोधनाचा फायदा : समाजमाध्यमांच्या कवेत येणार आता अंधही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:13 PM2018-01-05T14:13:27+5:302018-01-05T14:21:15+5:30
जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब्रेल लिपीच्याही पुढचे तंत्रज्ञानाची ओळख अंधांनी करून घेतली आहे.
सांगली : जगभर ब्रेल लिपी दिन साजरा होत असला तरी, तंत्रज्ञानाची प्रगती व विविध संशोधनाचा अंधांनाही फायदा होतानाचे चित्र आहे. सध्या संपूर्ण समाजावर मोहिनी असलेल्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्-अॅपसारखी समाजमाध्यमे अंधांनाही वापरता येतील अशी तंत्रे विकसित झाल्याने ब्रेल लिपीच्याही पुढचे तंत्रज्ञानाची ओळख अंधांनी करून घेतली आहे.
अंधांना ब्रेल लिपीमुळेच जीवनाचा दृष्टिकोन शिकता आला. अंधांना स्पर्शाने वाचण्यासाठी व लेखन करण्यासाठी या लिपीचा वापर झाला. दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा केला जातो. अंध व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया भक्कम करण्यासाठी ब्रेल लिपी आवश्यक असली तरी आता मात्र त्यात बदल होत आहेत.
सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युगात अनेक मार्ग खुले झाले आहेत. त्याचा उपयोग अंध करताना दिसून येत आहेत. सध्या बदलत्या तंत्रज्ञानाचा अंधांनी स्वीकार केल्याने अंध आता अत्यंत सफाईदारपणे संगणकावर काम करत आहेत.
संगणकावर असलेल्या जॉज या सॉफ्टवेअरमुळे हे शक्य झाले आहे. संगणकाची स्क्रीन वाचणाऱ्या या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गुगलसह इंटरनेटचा वापर सुलभ झाला आहे. गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळवणे यातून शक्य झाले आहे.
अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये असलेल्या टॉकबॅक प्रणालीतून अंध समाजमाध्यमे अगदी सहज वापरत आहेत. सध्या मोबाईलवर बोलतो, तो मेसेज टाईप होत असल्याने त्याचाही उपयोग अंधांना होत आहे.
केवळ दैनंदिन वापरावर अंध व्यक्ती आता थांबले नसून तंत्रज्ञानाचा वापर करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी व्हॉटस्-अॅपवर ग्रुपचीही निर्मिती झाली आहे.
टेक्नोलॉजी अॅक्सेस फॉर व्ही आय
खास अंधांसाठी टेक्नोलॉजी अॅक्सेस फॉर व्ही आय हा ग्रुप कार्यरत असून, यात सहा ते सात राज्यातील अंध कार्यरत आहेत. यात तंत्रज्ञानाचा वापर करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा होते.
जनार्दन कोळसे (पुणे), तुकाराम पवार (सोलापूर), अमोल हुलगुरे (कोल्हापूर) या अंध तरुणांनी ग्रुपची निर्मिती केली आहे, तर दोन अंध व्यक्तींनीच एसपी व्हॉटस्-अॅप म्हणून खास अंधांसाठी वापरण्यास सुलभ होईल, अशा व्हॉटस्-अॅपची निर्मिती केली आहे.