Sangli News: शिगावात वारणा नदीचे पाणी काळसर, परिसरात दुर्गंधी; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
By श्रीनिवास नागे | Published: February 6, 2023 06:18 PM2023-02-06T18:18:58+5:302023-02-06T18:22:16+5:30
शुद्ध नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा नदीला सध्या गटारीचे स्वरूप
शिगाव (सांगली) : सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना सुजलाम-सुफलाम करणाऱ्या व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत शुद्ध नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा नदीला सध्या गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शिगाव (ता. वाळवा) येथील नदीपात्रात काळे पाणी आले असून, दुर्गंधी पसरली आहे.
काही कारखान्यांची वारणा नदीत मळी सोडली असून त्यामुळे नदीचे पाणी काळसर बनल्याचे ग्रामस्थ सांगतात. शिगावजवळ संपर्ण पात्र काळसर दिसत आहे. वारणेतील मळीचे पाणी पिल्याने अनेक नागरिक आजारी पडू लागले आहेत, तर अनेक जलचर मृत झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना पायबंद बसला पाहिजे व पाणी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, यासाठी निसर्गप्रेमी ग्रुप (पेठवडगाव) यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निसर्गप्रेमी ग्रुपचे संदीप पाटील म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळ अशा गंभीर घटनेकडे प्रत्येकवेळी कानाडोळा करते. सर्वसामान्य जनतेच्या जिवाशी शासन का खेळत आहे? जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागेल. संबंधित व्यक्ती अथवा कंपनीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार आहोत. दरम्यान, शिगावच्या ग्रामपंचायत प्रशासनाने नळाला येणारे पाणी उकळून पिण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.
पाण्यात मळी सोडून हजारो लोकांच्या जिवाशी खेळण्याचे धाडस होतेच कसे, हा प्रश्न आहे. नागरिक आता पाणी प्रदूषणामुळे वैतागले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पावले उचलावीत. - चंद्रकांत देसाई, नागरिक, शिगाव