‘स्मार्ट सिटी’त सांगली डावलली, विमानतळाला निधी का नाही?; विशाल पाटील यांचा संसदेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:55 PM2024-07-30T17:55:25+5:302024-07-30T17:57:15+5:30

टेंभू, म्हैसाळला निधी देण्यात आखडता हात

Sangli not included in Smart City, no funds for airport; MP Vishal Patil attack in Parliament | ‘स्मार्ट सिटी’त सांगली डावलली, विमानतळाला निधी का नाही?; विशाल पाटील यांचा संसदेत हल्लाबोल

‘स्मार्ट सिटी’त सांगली डावलली, विमानतळाला निधी का नाही?; विशाल पाटील यांचा संसदेत हल्लाबोल

सांगली : सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही. आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का करण्यात आली नाही. टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी ए.आय.बी.पी. योजनेतून निधी देण्यात सरकार आखडता हात का घेत आहे, असा सवाल करत खासदार विशाल पाटील यांनी सोमवारी संसदेत हल्लाबोल केला. अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी महाराष्ट्रावरील अन्यायाचाही पाढा वाचला.

विशाल पाटील म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. दीड तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही. आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला. महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत. सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटीत येण्याची. इथे विमानतळाला निधी दिला नाही.

बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू, म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही. कराचा ३७ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो, भारताच्या जीडीपीचा १४ टक्के हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात एक ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे.

अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचण

विशाल पाटील म्हणाले, अर्थसंकल्पावर खूश असणारे काही खासदार मला म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे. मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही. मी परवा एक ट्रेलर पाहून बायकोसोबत सिनेमाला गेलो, अर्धा तासात कंटाळून बाहेर पडलो. अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे. कारण, या अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच अडचण आहे.

Web Title: Sangli not included in Smart City, no funds for airport; MP Vishal Patil attack in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.