सांगली : आचाऱ्याच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप, आरोपी मध्य प्रदेशचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 04:07 PM2018-08-25T16:07:17+5:302018-08-25T16:12:48+5:30
दारुसाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्यनारायणदास रामदाससिंग भदोरीया (वय ५६, रा. खलीलपूर, मध्य प्रदेश) यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र बिष्ट यांनी शनिवारी हा निकाल दिला.
सांगली : दारुसाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरुन महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) याचा खून केल्याप्रकरणी आरोपी सत्यनारायणदास रामदाससिंग भदोरीया (वय ५६, रा. खलीलपूर, मध्य प्रदेश) यास दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विरेंद्र बिष्ट यांनी शनिवारी हा निकाल दिला.
मृत महादेव चव्हाण व भदोरिया हे दोघे मिरजेत एकत्रित आचारी काम करीत होते. दोघांनाही दारुचे व्यसन होते. ते दररोज एकत्रित दारु पिण्यास जात असे. दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी चव्हाण हा मिरजेतील हॉटेल कोहिनूरमध्ये काम करीत होता. त्यावेळी भदोरिया याने त्यास हॉटेल बाहेर बोलावून घेतले.
दारु पिण्यास जाऊ, असे सांगून भदोरिया याने चव्हाणला मिरज रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर नेले. तिथे ते एका बाकड्यावर बोलत बसले होते. भदोरिया याने चव्हाणकडे दारु पिण्यास पैशाची मागणी केली. चव्हाणने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे भदोरियाला राग आला. त्याने खिश्यातील चाकू काढून चव्हाणच्या पोटावर, छातीवर वार केले होते. यामध्ये चव्हाण रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावला होता.
मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करुन भदोरिया यास अटक केली होती. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी या खटल्याचे काम पाहिले. सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सतीश लोंढे, फिर्यादी प्रकाश कुंभार, पंच अमित कांबळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. गेल्या काही दिवसापून या खटल्याचे काम सुरु होते. त्याचा शनिवारी निकाल लागला.
प्रवाशांची आरडाओरड
भदोरिया याने चव्हाण हल्ला केल्यानंतर स्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड सुरु केली होती. हा प्रकार पाहून स्थानकात ड्युटीवर असलेले मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रकाश कुंभार यांनी धाव घेतली. तेवढ्यात भदोरिया हा पळून गेला होता. कुंभार याने त्यास पाठलाग करुन पकडले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदिवे व चंद्रकांत भोसले यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.