सांगलीमध्ये कांदा १३० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:23 PM2019-12-09T14:23:43+5:302019-12-09T14:24:24+5:30
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कांद्याच्या दराने शुक्रवारी उच्चांक गाठला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ हजार रुपये क्विंटल इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली. प्रति किलोस १३० रुपये असा भाव कांद्यास मिळाला. आजवर कृषी उत्पन्न बाजार समितीत इतका चढा भाव कांद्याला कधीच मिळाला नव्हता. आजवरचा कांद्याचा हा विक्रमी दर आहे.
सांगली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या कांद्याच्या दराने शुक्रवारी उच्चांक गाठला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ हजार रुपये क्विंटल इतक्या उच्चांकी दराने कांद्याची विक्री झाली. प्रति किलोस १३० रुपये असा भाव कांद्यास मिळाला. आजवर कृषी उत्पन्न बाजार समितीत इतका चढा भाव कांद्याला कधीच मिळाला नव्हता. आजवरचा कांद्याचा हा विक्रमी दर आहे.
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा सगळ्यात मोठा फटका कांद्याच्या पिकास बसला आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झाली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने महिन्याभरापासून वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
जून, जुलै महिन्यात रोज आठ ते दहा हजार पोती कांद्याची आवक होत होती. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यातही आवक चांगली होती. नोव्हेंबर महिन्यापासून कांद्याची आवक घटली आहे. डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून आजअखेर कांद्याची आवक केवळ तीन ते चार हजार पोती आवक होत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत केवळ सध्या २० टक्केच कांदा आवक होत आहे. आवक होत असलेल्या कांद्यापैकी ५० टक्के कांदा खराब आहे. तरीही तो कांदा प्रति किलो ५० रुपयांनी घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये कर्नाटकातून कांद्याची चाळीस ते पन्नास ट्रक आवक होते. पण शेतकऱ्यांच्या हाती पीक लागले नसल्यामुळे शुक्रवारी केवळ दोन ते तीन ट्रक कांद्याची आवक झाली.
कर्नाटकसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शुक्रवारी मार्केट यार्डात केवळ पंधरा ट्रकमधून १५० टन कांद्याची आवक झाली आहे, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पोपटानी यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, उत्तम प्रतीचा कांदा १३० रुपये किलो असून प्रतवारीप्रमाणे ५० रुपये आणि ११० रुपये किलो भाव आहे. दरवाढीने हॉटेलात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. अजून काही दिवस तरी दरात घसरण होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.