सांगली : अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात संधी : डी. टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:28 PM2018-12-24T23:28:41+5:302018-12-24T23:32:43+5:30
मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
सांगली : मानवी जीवनाला दिशा देणारा विषय म्हणून अर्थशास्त्राकडे पाहिले जाते. जगणे सुखकर करण्यासाठी या विषयाची समज आवश्यक आहे. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतून आयएएस, आयपीएसप्रमाणेच इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसमध्ये करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी सांगलीत केले.
येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात आयोजित शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेच्या २९ व्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. शिर्के म्हणाले, अर्थशास्त्र विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या विषयातील संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभ्यासगटांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. या विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. काही विषय असे असतात त्यावर जग चालते, त्या या विषयांचा समावेश आहे. त्यामुळेच संपूर्ण जगात या विषयाला मागणी आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनालाही महत्त्व द्यावे.
शिवाजी विद्यापीठाच्यावतीने संशोधनाला विशेष महत्त्व देण्यात येत असून, संशोधन प्रकल्पासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाने यासाठी प्रस्ताव सादर करून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढविण्यास प्राधान्य द्यावे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांतून आयएएस, आयपीएस होता येतेच, शिवाय अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आयईएस होऊन देशभरात सेवेची संधी मिळत आहे. विमाशास्त्रातही विद्यार्थ्यांना संधी वाढत आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून आपले करिअर समृध्द करावे. यावेळी ‘सुयेक’चे अध्यक्ष उल्हास माळकर, प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, मेधा भागवत, मंगल माळगे, बी. जी. कोरे, संतोष यादव, रोहिणी देशपांडे, सुभाष दगडे, पी. जे. ताम्हनकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
‘नेट’चा वापरसुध्दा ‘नेटा’नेच करा
शिर्के म्हणाले, सध्या मोबाईलवर मिळत असलेल्या इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजनासाठी नको, तर अभ्यासासाठी करावा. नेटव्दारे अभ्यास केल्यास अधिक सोप्या पध्दतीने अभ्यास होतो. नेटचा वापर करून रोजच्या जगण्यातील अर्थशास्त्रही विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे.
सांगलीत सोमवारी अर्थशास्त्र परिषदेत डी. टी. शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आर. जी. कुलकर्णी, डॉ. जे. एफ. पाटील, मेधा भागवत उपस्थित होते.