स्थायी समिती सभापतीपदी सांगली की मिरजेचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:55+5:302021-09-08T04:32:55+5:30
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. मिरजेतून निरंजन आवटी, तर सांगलीतून सविता मदने यांची नावे ...
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. मिरजेतून निरंजन आवटी, तर सांगलीतून सविता मदने यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदस्यांशी संपर्क साधत ऑनलाइन मते जाणून घेतली. दरम्यान, सभापतीपदासाठी बुधवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
स्थायी समितीत भाजपचे ९, काँग्रेस ४, तर राष्ट्रवादीचे ३ सदस्य आहेत. काँग्रेसने सभापतीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. भाजपच्या तीन नगरसेवकांनाही गळ्याला लावले होते. ही कुणकुण लागताच भाजपने सर्व नऊ सदस्यांना हैदराबाद सहलीवर पाठविले. त्यामुळे काँग्रेसच्या फोडाफोडीच्या प्रयत्नाला ब्रेक लागला.
काँग्रेसने निवड प्रक्रियेवर शंका घेत विभागीय आयुक्त, महसूलमंत्र्यांकडे तक्रार केली होती. निवडणूक लांबणीवर टाकण्याचा त्यांचा डाव होता; पण त्याबाबत मंगळवारी कोणतेही निर्देश महापालिकेला प्राप्त न झाल्याने निवडी लांबणीवर जाण्याची शक्यताही धूसर बनली आहे. आता भाजपच्या नाराजांवरच काँग्रेसच्या सभापतीपदाचे स्वप्न अवलंबून आहे.
दरम्यान, सोमवारी भाजपचे नऊ सदस्य हैदराबादहून सोलापूरला आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या सदस्यांशी चर्चा केली. त्यांची ऑनलाइन मते जाणून घेतली. रात्री उशिरा हे सदस्य पुण्याकडे रवाना होणार असल्याचे समजते. बुधवारी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्याकडून उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. ज्याला उमेदवारी मिळेल, तोच सांगलीला अर्ज भरण्यासाठी येणार आहे. उर्वरित सदस्य पुण्यातूनच मतदान करतील, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
सभापतीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजपमधून निरंजन आवटी व सविता मदने यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय संजय यमगर, जगन्नाथ ठोकळे यांनीही नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. त्यात सभापतीपद सांगलीला मिळणार की मिरजेला, याचीही उत्सुकता लागली आहे.
चौकट
काँग्रेसने नाद सोडला
भाजपमध्ये फूट पाडून काँग्रेसने सभापतीपदाचे स्वप्न पाहिले होते; पण या लढाईत काँग्रेसचे सदस्य एकटेच प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यात शेवटचा प्रयत्न म्हणून निवडी लांबणीवर टाकण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी महसूलमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली; पण हा बारही फुसका ठरला. त्यामुळे आता काँग्रेसनेही सभापतीपदाचा नाद सोडल्याचेच दिसून येते.
चौकट
१४ अर्ज नेले
सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. मंगळवारी भाजपने दहा, तर काँग्रेसने चार उमेदवारी अर्ज घेतले. त्यामुळे सभापतीपदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.