सांगली : कामचूकार बीएलओंवर फौजदारी कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:44 PM2018-09-29T13:44:54+5:302018-09-29T13:46:34+5:30
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाºया सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
सांगली : मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाºया सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
तथापि, बहुतांश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षक यांनी काम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. मतदार नोंदणी कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले की, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत संबंधित बीएलओ व पर्यवेक्षक यांना १ जानेवारी रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा नवमतदारांची व इतर राहिलेल्या व्यक्तिंची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, बहुतांश बीएलओ व पर्यवेक्षक यांनी काम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी मतदार नोंदणी कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते.
त्यामुळे उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांनी बीएलओ व पर्यवेक्षक यांच्याकडून प्राधान्य तत्त्वावर नवमतदार व शिल्लक राहिलेल्या मतदारांची नोंदणी त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे बीएलओ व पर्यवेक्षक हे काम करणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी शिफारस करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
रविवार दि. ३० सप्टेंबर व २ आॅक्टोबरला महापालिका क्षेत्र व जिल्ह्यातील अन्य शहरात विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असून, या दोन्ही दिवशी जास्तीत जास्त नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी केले आहे.